लातूर : एजाज शेख
आता वाट पाहणे नाही, आता सरळ सरळ मैदानामध्ये दोन हात होणार यात शंका नाही. शेतक-यांच्या सहनशीलतेचा विमा कंपनीने अंत पाहू नये, संबंधित सर्व शेतक-यांना सोबत घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटना लवकरच उग्र स्वरूपाचे आंदोलन करून शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आंदोलनामध्ये जे होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीची राहील, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या २०२५ चा खरीप पीक विमा या संदर्भामध्ये दस्तूर खुद्द मुख्यमंर्त्यांनी हेक्टरी १७ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ती ही अमलात आली नाही. दुसरी गोष्ट, अशी की, विमा कंपनी अतिशय बालिश पणाने वागत आहे. विमा कंपनी जे पीक विमा कंपनीचे प्रयोग यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पीक कापणीचे प्रयोग व्यवस्थित झाले नाहीत तसेच रॅन्डम पद्धतीने निवडलेले प्लॉट चुकीचे निवडले, पीक कापणी प्रयोगांती आलेले वजन व्यवस्थित नाहीत, योग्य नाही, असे बालिश आणि कोणालाही न पटणारी कारणं घेऊन विमा कंपनी शेतक-यांच्या हक्काचा विमा त्यांना मिळू नये यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे. अतिशय धक्कादायक म्हणजे विमा कंपनीने आणखी न एक असा आक्षेप घेतला की रँडम पद्धतीने जे प्लॉट निवडले त्या ठिकाणी पीक नव्हते. पीक नव्हते तर वजन कशाचे कमी, अधिक आले हाही मोठा प्रश्न आह.े म्हणजे हे आरोप केवळ बालिशपणाचे आरोप आहेत.
लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये अगदी असाच बालिशपणाचा पोर खेळ विमा कंपनी शेतक-यांच्या सोबत खेळत आहे. लातूरमध्ये ८८ तर धाराशिवमध्ये २१७ आक्षेप विमा कंपनीने नोंदवले आणि रीतसर तक्रार जिल्हा समितीकडे केली. विमा कंपनीचा बालिशपणा व केलेले आरोप निराधार असल्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नसल्यामुळे जिल्हा समितीने विमा कंपनीचे अपील फेटाळले. त्यानंतर विमा कंपनीने राज्य तांत्रिक समितीकडे अपील दाखल केले परंतु विमा कंपनीचा हा पोरखेळ वेळ काढूपणाचा असल्याचे राज्य समितीने ओळखून एका फटक्यात विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले. आता विमा कंपनीने वेळ न घालवता शेतक-यांना त्यांच्या हक्काचा विमा द्यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटीचे सदस्य राजेंद्र मोरे, मराठवाडा उपाध्यक्ष नवनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण शिंदे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, रेणापूर तालुकाध्यक्ष अशोक दहिफळे यांनी दिला आहे.

