मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जालना येथे केली असली तरी प्रत्यक्षात आज मराठवाड्यात दुष्काळ ‘आ’ वासून उभा आहे. कोल्हापूर आणि सांगली परिसरातील पुराचे अतिरिक्त पाणी उजनी धरणात आणून त्यातील ३५ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. यासोबतच पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे सुमारे ८० टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरी खो-यात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले होते. परंतु भविष्याच्या गप्पा मारण्यापेक्षा वर्तमानात काय वाढून ठेवले आहे ते बघितले पाहिजे. मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विभागीय महसूल उपायुक्तांकडे करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील सर्व छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. मराठवाड्यातील चित्र अत्यंत गंभीर असून पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही या भागातील एकाही जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. जो थोडाफार पाऊस झाला होता त्या पावसावर शेतक-यांनी पेरणी केली. परंतु गत दीड-दोन महिने कोरडे गेल्याने शेतक-यांनी पेरलेली पिके धोक्यात आली असून खरीप हंगामातील पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या मोठ्या संकटात आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत द्यावी. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतमजूर, भूमिहीन कुटुंबांना रोजगाराची व्यवस्था रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे, मराठवाड्यातील सर्व तलावांतील पाणीसाठा हा भविष्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने आरक्षित करणे आवश्यक आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन शेतक-यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
अनेक भागात उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. गत तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, बाजरी, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि ऊस पिकांवर संकट आले आहे. ऐन मोक्याच्या क्षणी पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली परिस्थिती थेट पीक उत्पादकतेवर गदा आणणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँगे्रस नेते आणि माजी आमदार धिरज देशमुख यांनी लातूरसह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागामध्ये कृत्रिम पाऊस (क्लाऊड सिडिंग) पाडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी केवळ पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने वापर करण्याची गरज आह.े हे तंत्रज्ञान हमखास पाऊस पाडेल, असा दावा नाही, मात्र योग्य हवामान आणि ढगांची परिस्थिती उपलब्ध असेल, तर हा पर्याय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तपासून पाहिला पाहिजे. शेतकरी संकटात असताना सरकारकडे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरला गेला पाहिजे, असे धिरज देशमुख यांनी म्हटले आहे.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे शेतक-यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. यंदाच्या मान्सून हंगामाने शेतक-यांची कठोर परीक्षा घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी देशातील एकूण पावसाची तूट १४ टक्क्यांवर पोहोचली आहे. असमान आणि अनियमित पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. भाताच्या क्षेत्रात ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे तर मक्याच्या क्षेत्रात ४ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये पावसाची तूट २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बिहार, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशामध्ये ही तूट ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १ जून ते २९ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात पावसाची तूट सुमारे १० टक्के आहे, तर मराठवाड्यात २८ टक्के आणि विदर्भात २४ टक्के आहे. याचा फटका खरीप पिकांना बसला असून विविध भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
















