लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुरुड येथील पारुनगर जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळखली जाते. या प्रशालेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सातत्याने विशेष प्रयत्न केले आहेत. इयत्ता ९ वीची तुकडी मंजुरीसाठीही त्यांनी पाठपूरवा केला होता. त्यास यश आले असून विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यापूर्वी प्रशालेतील सेमी इंग्लिश विभागातील सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवीची अतिरिक्त तुकडी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत विशेष बाब म्हणून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मंजूर करून घेतली होती. त्याच अनुषंगाने यावर्षी इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववीची तुकडी मंजूर होणे आवश्यक होते. मात्र फेब्रुवारी २०२६ पर्यंत नववीची तुकडी मंजूर नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये पुढील शिक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
ही बाब शालेय प्रशासन, व्यवस्थापन समिती व स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माजी मंत्री, अमित विलासराव देशमुख व माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती यांच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडील प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविण्यात आला. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. दिनेश नवगिरे यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची भेट घेऊन या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर या प्रस्तावाला गती मिळाली.
या पाठपुराव्याला यश मिळून शिक्षण विभागाने मुरुड पारुनगर प्रशालेस इयत्ता नववीची तुकडी मंजूर केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे तसेच संबंधित शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
















