व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आणि परिसर बुधवारी दुपारी दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरला. या विनाशकारी भूकंपात हजारो नागरिक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतींच्या ढिगा-याखाली अनेकजण अडकले आहेत. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार कराकसच्या पश्चिमेला १६० किमी अंतरावर बुधवारी दुपारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला आणि दुस-याच मिनीटाला ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. निसर्गाच्या या प्रकोपात अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या इमारतींच्या ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. व्हेनेझुएलाचे हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भूकंपामध्ये किमान १५० ते २०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुस-या एका महितीनुसार १० हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सरकारचे सारे लक्ष बचावकार्यावर आहे. विदेशातूनही बचावकार्यासाठी पथके येत आहेत. राजधानीतील विमानतळ बंद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी हा भूकंप झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. प्रशासनाने नागरिकांना मोकळ्या जागी थांबण्याचे आवाहन केले. भूकंपामुळे अनेक ठिकाणी वीज गेली, मोबाईल फोन बंद पडले त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला. या भूकंपामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, काही इमारती झुकल्या असून कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कराकसमधील मेट्रो सेवा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थगित करण्यात आला आहे. शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भूकंपानंतर २० धक्के (आफ्टरशॉक्स) जाणवले. या भूकंपानंतर भारतासह अनेक देशांनी व्हेनेझुएलाला मदतीचा हात दिला आहे. जपानमध्येही ६.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाला निसर्गाच्या एका महाभयंकर प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर काही सेकंदाच्या अंतराने एका पाठोपाठ अशा दोन प्रचंड शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते या देशाच्या गेल्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासातील हा सर्वांत विनाशकारी आणि मोठा भूकंप आहे.
या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, पॅसिफिक महासागराच्या दुस-या बाजूला असलेल्या जपानमध्येही ६.९ तीव्रतेचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास पहिला भूकंप झाला. ज्याची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल होती. पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू व्हेनेझुएलाच्या मोरीन या किनारपट्टीच्या शहराजवळ समुद्रसपाटीपासून साधारण १३ किमी खोलीवर होता. लोक या धक्क्यातून सावरत नाहीत तोच अवघ्या ३९ सेकंदानंतर दुसरा आणि अत्यंत घातक मुख्य झटका (मेन शॉक) बसला. ज्याची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल इतकी प्रचंड होती. या दुस-या भूकंपाची खोली जमिनीपासून केवळ १० किमी खाली असल्यामुळे त्याचा विनाशकारी परिणाम भूपृष्ठावर अत्यंत भीषण पद्धतीने पहायला मिळाला. या भूकंपाचा सर्वांत मोठा फटका राजधानी कराकस आणि आसपासच्या निवासी भागांना बसला. भूकंप होताच काही मिनिटांतच संपूर्ण कराकस शहर धुळीने वेढले गेले. शहरातील अल्तामिरा आणि चाकाओ भागात भूकंपाचे सर्वांत विदारक दृष्य पहायला मिळाले. अनेक टोलेजंग इमारती आणि शॉपिंग सेंटर्स पत्त्यांसारखे सेकंदाच्या आत कोसळले.
अल्तामिरा येथील एक भव्य २२ मजली रहिवासी इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. इमारत कोसळताच संपूर्ण परिसरात रडारड आणि आरडाओरड सुरू झाली. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती रॉड्रिग्ज यांनी देशात तातडीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. टीव्हीवरून जनतेला शांत राहण्याचे आणि तातडीने उघड्या मैदानात येण्याचे आवाहन करण्यात आले. सातत्याने येणा-या आफ्टरशॉक्सच्या धोक्यामुळे कमकुवत झालेल्या इमारतींमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला. कोसळलेल्या ढिगा-याखाली गॅस पाईपलाईन फुटून आगीसारखी दुसरी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमधील मुख्य गॅस आणि वीजपुरवठा सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ बंद केला. नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी रस्ते रिकामे ठेवावे जेणेकरून रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांना बचाव कार्यासाठी वेगाने जाता येईल. सध्या स्थानिक स्वयंसेवक, लष्कर आणि आपत्कालीन पथके ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवत आहेत. भूकंपतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएला कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्सवर वसलेले आहे. त्यामुळे तेथे सतत भूकंप होण्याची शक्यता असते. १९८२ मध्ये व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाने ३० हजार लोकांचा बळी घेतला होता. हा भूकंप इतिहासातील सर्वांत मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानला जातो.
यापूर्वी १९०० साली व्हेनेझुएलाला ७.७ तीव्रतेच्या भूकंपाने उद्ध्वस्त केले होते. शास्त्रज्ञांच्या मते, काल झालेला भूकंप प्रामुख्याने कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट यांच्यामध्ये झालेल्या अंतर्गत हालचालींमुळे झाला. उत्तर व्हेनेझुएलाच्या भूभागाखाली असलेल्या या दोन्ही अवाढव्य टेक्टॉनिक प्लेट्स तिथल्या फॉल्ट लाइन्सवर (भूकंपीय तडे) एकमेकांना समांतर सरकत असतात. गत अनेक वर्षांपासून या फॉल्टस्वर प्रचंड भूगर्भीय ताण निर्माण झाला होता, हा ताण अचानक मुक्त झाल्यामुळे भूकंपाचे हे दोन तीव्र धक्के जाणवले. जपान आणि चिलीसारख्या देशात जेव्हा भूकंप होतो, तेव्हा सहसा एक टेक्टॉनिक प्लेट दुस-या प्लेट्सच्या खाली सरकते, त्याला विज्ञानाच्या भाषेत ‘सबडक्शन’ म्हटले जाते. या प्रक्रियेमुळे तिथे मोठे भूकंप आणि जागृत ज्वालामुखींचा उद्रेक होतो. याउलट व्हेनेझुएलामध्ये प्लेट्स एकमेकांच्या खाली जात नाहीत, तर त्या एकमेकांवर बाजूने घासल्या जातात. यामुळे तिथे ज्वालामुखींचा धोका नसला तरी फॉल्ट लाईन्सवर अचानक निर्माण होणारा दाब शहरांना हादरवण्यासाठी पुरेसा ठरतो. एकूण काय, नैसर्गिक प्रकोपापुढे माणूस हतबल आहे!
















