लातूर : प्रतिनिधी
उत्तरप्रेदशमधील लखनऊ येथील इमारतीला आग लागुन झालेल्या दुर्घटनेत १५ निश्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ सर्तक होऊन शहरातील खाजगी क्लासेस, महाविद्यालय, हॉस्टेल्स व्यवसायीक व रहिवाशी इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट करावे असे निर्देश देऊन या सर्व इमारतीमध्ये विहीत वेळेत अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येण्यासाठी ठोस पाऊले उचलावित अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी दिल्या आहेत.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी अग्निशमन विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. लातूर शिक्षणाची पंढरी असुन शहरातील विविध भागांमध्ये विद्यालय, महाविद्यालय यासह हॉस्टेलच्या अनेक इमारती आहेत. याठिकाणी शहरासह जिल्हा व परजिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या राज्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आगीसारख्या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांना जीव गवमावा लागणार नाही याची दक्षता महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेणे गरजेचे असल्याचे सभापती सचिन बंडापल्ले यांनी स्पष्ट केले. केवळ शैक्षणीक संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांचेच प्राण नव्हे तर व्यावसायिक व रहिवाशी इमारतीतील नागरिकांचे प्राण ही तितकेच मोलाचे असल्याचे सभापती बंडापल्ले यांनी निदर्शनास आणून दिले.
सभापती सचिन बंडापल्ले यांनी अग्निशमन विभागाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, या सर्व इमारतीचे तात्काळ फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. याकरीता अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी लगेचच हि मोहीम हाती घ्यावी. ज्या इमारती मध्ये अग्निशामक सुरक्षा यंत्रणा योग्य आहे त्या इमारतींना प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ज्या इमारतींमध्ये ही यंत्रणा नादूरुस्त अथवा उपलब्ध नाही त्यांना ठराविक मुदत देऊन नोटीस देण्यात यावी अशी सुचना केली. केवळ एवढ्यावरच न थांबता ठराविक मुदत संपल्या नंतर पुन्हा त्या इमारतींचे ऑडिट करुन आग्निशामक सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत का नाही याची शहानिशा करावी असे सांगुन या सर्व बाबींचा आढावा आगामी काही दिवसात देण्यात यावा असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी दिले आहेत. त्याच बरोबर आगीच्या दुर्घटनेतून कशा पध्दतीने बचाव करावा याबाबतची जनजागृती ही विभागाच्या वतीने करण्यात यावी अशी सुचना दिली आहे.यावेळी अग्नीशामक सुरक्षा प्रमुख गणेश चौधरी, बापूसाहेब जाधव यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
















