जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू परिसरात ्रसलग तिस-या दिवशी जोरदार पाऊस बरसला आहे. यामुळे या परिसरातील पेरणीची कामे खोळंबली आहेत . जळकोट तालुक्यात दि २२ जून रोजी रात्री पाऊस पडला. दि २४ जून रोजी दुपारी एक वाजल्याच्या नंतर जोरदार पाऊस पडला व दि २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान उमरगा रेतू परिसरात जोरदार पाऊस पडला. या परिसरातील शेतकरी हे कपाशीची लागवड करण्यासाठी तसेच पेरणी करण्यासाठी शेतीमध्ये गेले होते
परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली. उमरगा रेतू परिसरातील चेरा, वांजरवाडा, धामणगाव, शेलदरा आदी भागामध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे जलस्त्रोतामध्येही वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाईही कमी झाली आहे. उमरगा रेतू येथे चार दिवसापूर्वी पाणीटंचाई होती. या गावास टँकर सुरू करावे अशी मागणीही करण्यात आली होती परंतु दि २२ जून रोजी रात्री झालेल्या पावसामुळे तलावात पाणी आले आहे तसेच इतर जलस्त्रोतही सुरू झाले आहेत. यामुळे या गावातील पाणीटंचाईही कमी झाली आहे.
















