सरकारविरोधात घोषणाबाजी, संसदेत गदारोळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असल्याने भारतात गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एस्मा कायद्याची अंमलबजावणी करून घरगुती गॅस वाटपाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस वाटप बंद झाल्याने उद्योग, व्यवसाय आणि हॉटेलला याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच गॅस टंचाईच्या मुद्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी गॅसटंचाईच्या मुद्यावरून गोंधळ घालायला सुरुवात केली. तत्पूर्वी संसदेच्या प्रांगणातही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला. देशात गॅसचा तुटवडा असून, अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलिंडरसाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी मोबाईल अॅप आणि ऑनलाइन बुकिंग अडचणींमुळे नागरिक थेट गॅस एजन्सीसमोर झुंबड घालताना दिसत आहेत. मात्र, सरकार गॅसची टंचाई नसल्याचा दावा करीत आहे. तसेच विरोधकांवर अफवा पसरवल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली असून, या मुद्यावरून संसदेत विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी ८ निलंबित खासदारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. यावर सभापती ओम बिर्ला यांनी जर सभागृहात तुम्ही टेबलांवर चढलात तर कारवाई केली जाईल. संसदेची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे म्हटले.
त्यानंतर लोकसभा प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. दुपारी २ वाजता सुरू झालेले कामकाज केवळ एक तास चालले. त्यानंतर लोकसभा १६ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. या काळात विरोधकांनी गोंधळ घालत पंतप्रधान मोदींविरुद्ध घोषणाबाजी सुरूच ठेवली. तत्पूर्वी विरोधी पक्षांनी संसदेच्या परिसरात फलक दाखवून एलपीजी संकटाचा निषेध केला. दरम्यान, महाराष्ट्रातही गॅस दरवाढ आणि टंचाईच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
संकटात विरोधकांनी
सरकारला साथ द्यावी
विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परदेशातील घडामोडींमुळे देशात काही अडचणी येत आहेत. सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पूर्णपणे तयार राहण्यासाठी पावले उचलत आहे. अशावेळी विरोधकांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. परंतु ते बेजबाबदारपणे वागत आहेत, अशी टीका केली.
देशात एलपीजीचा
मोठा तुटवडा नाही
ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशातील गॅस पुरवठ्याबाबत माहिती दिली. देशात एलपीजीचा मोठा तुटवडा नाही आणि नागरिकांनी घाबरून गॅस बुकिंग करण्याची गरज नाही. घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा नियमित पद्धतीने सुरू असून वितरण व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवले जात आहे. उपलब्ध एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती ग्राहकांना प्राधान्याने दिला जात आहे. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांनाही गॅस पुरवठा दिला जात आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

