27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeसंपादकीयग्रामीण कौल कमळाला

ग्रामीण कौल कमळाला

महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणा-या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणा-या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १४६२ पंचायत समिती जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते. राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा जिल्ह्यांमध्ये भाजपला बहुमत अथवा सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी दोन तर काँग्रेस व शरद पवार गटाला प्रत्येकी एका जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाने गत काही वर्षांत फोडाफोडी, पक्षांतरे आणि अनपेक्षित सत्तांतराचा एक अत्यंत अस्थिर कालखंड अनुभवला आहे.

राजकीय पक्षांची पडझड, अधिकृत चिन्हांचे हस्तांतरण आणि पहाटेच्या शपथविधीपासून ते दुखवट्याच्या काळात झालेल्या सत्ताग्रहणापर्यंतच्या सर्व घटनांनी राज्याच्या नैतिक राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, या सर्व राजकीय चिखलात आता भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ अधिक ताकदीने फुलले असल्याचे चित्र विधानसभा निकालांपासून ते कालच्या पंचायत समिती निकालापर्यंत स्पष्टपणे उमटले आहे. मतदारांनी गोंधळाच्या राजकारणाऐवजी स्थैर्याला पसंती देत राज्याची धुरा पुन्हा एकदा कमळाच्या हाती सोपवली आहे. भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या या प्रचंड यशामुळे महायुतीमधील त्यांचे सहकारी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर भविष्यातील अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

भाजपच्या विजयी जागांची अवाढव्य संख्या पाहता, सत्तेच्या केंद्रस्थानी भाजपच राहणार असल्याचे सिध्द झाले आहे. परिणामी सत्तेत सहभागी असूनही शिंदे आणि पवार गट एका विशिष्ट दबावाखाली आणि अनिश्चिततेच्या छायेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रात आणि राज्यात वरचढ ठरलेल्या भाजपने आपल्या मित्रपक्षांच्या तुलनेत जनमानसात आपले स्वतंत्र स्थान बळकट केले आहे. मुंबईच्या सत्तेसाठी आणि मराठी अस्मितेसाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी मुंबईत राजकीय मोर्चेबांधणी केली होती. मात्र मतदारांनी या भावनिक आवाहनांना अपेक्षित प्रतिसाद दिल्याचे दिसले नाही. ठाकरे गटाची ‘मशाल’ आता मंदावल्याचे चित्र असून मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच थांबल्याचे दिसत आहे. एकेकाळी मुंबईवर एकहाती सत्ता गाजवणा-या या शक्तींच्या हातातून केवळ मुंबईची सत्ताच गेली नाही तर ग्रामीण भागातील जनाधारही मोठ्या प्रमाणावर आटला आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे.

ग्रामीण भागातील काँग्रेसचा प्रभाव कमी झाला असून, पक्षाची संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी’चा आवाजही ऐकू येईनासा झाला आहे. ती पूर्णपणे शक्तीहीन भासत आहे. एकेकाळी राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणारे हे पक्ष आता राजकीय नकाशावरून पुसले जातात की काय अशी परिस्थिती आहे. थोडक्यात काय तर, महाराष्ट्राच्या मतदारांनी राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर समृध्दीचे प्रतीक मानल्या जाणा-या कमळाला पसंती दिली आहे. राज्याची आर्थिक प्रगती आणि विकासकामांचा वेग कायम राखण्यासाठी जनतेने दिलेला हा कौल भाजपला अधिक सामर्थ्यवान बनवणारा आहे. तेव्हा एकेकाळी राज्यावर सत्ता गाजवणा-या अन्य प्रतिथयश पक्षांनी खडबडून जागे होण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. राज्यातील जि. प. व पं. स. निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला तर शिंदे सेना व अजित पवार गटाला दुस-या व तिस-या क्रमांकाचे यश मिळाले. महायुतीला राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेने कौल दिला. विरोधकांना पुन्हा एकदा मोठा तडाखा बसला असून, त्यांची ससेहोलपट सुरूच आहे.

सर्वसाधारणपणे राज्यात ज्याची सत्ता त्यालाच जि. प. व पं. स. निवडणुकीत मतदान करण्याकडे मतदारांचा कल असतो, ते या निवडणूक निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. भाजपने जि. प. निवडणुकीत द्विशतकी टप्पा पार केला तर शिंदे सेना व अजित पवार गटाने शतकी पल्ला पार केला. म्हणजेच पुन्हा एकदा महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिला. मविआमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा म्हणजे अर्धशतकी पल्ला पार करणारा पक्ष ठरला. त्यानंतर उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा क्रमांक लागतो. विविध नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या होत्या. सिंधुदुर्गात भाजपला घवघवीत यश मिळाले. मंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. रत्नागिरी हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गड मानला जातो. येथे शिंदे सेनेने वर्चस्व सिध्द केले.

रायगड जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही पक्ष आमनेसामने होते. मात्र शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात चुरस झाली. भाजप तिस-या क्रमांकावर राहिला. साता-यात भाजपा पहिल्या, अजित पवार गट दुस-या तर शिंदे सेना तिस-या स्थानी राहिली. पुण्यात अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपा दुस-या तर शिंदे सेना तिस-या स्थानी राहिली. लातूर जि. प. मध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यांनी ५९ पैकी २३ जागा जिंकल्या. भाजपला १८ तर अजित पवार गटाला १२ जागा मिळाल्या. पंचायत समित्यांमध्ये अहमदपूर, जळकोट, उदगीर येथे अजित पवार गट तर चाकूर, रेणापूर, लातूर येथे काँग्रेसने सत्ता मिळवली. शिरूर अनंतपाळ, देवणी, औसा, निलंगा येथे भाजपला यश मिळाले. धाराशिवमध्ये जि. प. निवडणुकीत भाजपा व शिंदे सेनेत चुरस होती. या निवडणुकीत महायुती काही जागांवर एकत्रित लढली तर काही ठिकाणी चुरस पहायला मिळाली.

पं. स. निवडणुकीत परंडा, भूम, वाशी, लोहारा तालुक्यांत शिंदे सेनेला यश मिळाले तर कळंब आणि तुळजापूर भाजपाने, धाराशिव व उमरगा उबाठाने जिंकल्या. परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर, सुरेश वरपूडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. वरपूडकरांना मतदारांनी जोरदार धक्का दिला. त्यांच्या घरातले पाचपैकी चार उमेदवार आडवे करून मतदारांनी घराणेशाही नाकारली. जि. प. मध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, अजित पवार गट दुस-या क्रमांकावर राहिला. सोलापूर जि. प. मध्ये महायुतीने मोठे यश मिळवले. पं. स. निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले. कोल्हापुरात अजित पवार गटाने २० जागा जिंकल्या. काँग्रेसला १५ तर भाजपला ११ जागा मिळाल्या. आजपर्यंत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात फारसे यश मिळाले नव्हते. परंतु या वेळी पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपची शक्ती वाढल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR