विदर्भ आणि मराठवाडा परिसर शनिवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या धक्क्याने हादरला त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास वाशिम शहर, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेंबाळ पिंपरी, नांदेड शहर व परिसर, हिंगोली तालुक्यातील पांगरा शिंदे येथे हलके ते मध्यम धक्के बसल्याची नोंद झाली. काही ठिकाणी भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. गत काही वर्षात या भागात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पूर्वी या भागात ४.५ तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले होते मात्र या वेळी तीव्रता अधिक असल्याने सुमारे ३० ते ३५ टन ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी काळात भूकंपाचे धक्के वाढत गेले तर मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भूकंपप्रवण क्षेत्राचे सखोल भौगोलिक सर्व्हेक्षण करून कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.
३० ऑक्टोबर १९९३ रोजी किल्लारी येथे झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर मराठवाड्यातील ही सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक बांधकामाची गरज अधिक अधोरेखित होते. विशेषत: माती व दगडांच्या घरांना धोका अधिक असून मजबूत आणि नियोजनबद्ध बांधकाम असलेल्या घरांचे नुकसान तुलनेने कमी होते त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी बांधकाम पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. भूकंपाच्या भूगर्भीय कारणांबाबत बोलताना, जमिनीखालील पाण्याचा साठा, पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक रचना यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे औंधकर यांनी नमूद केले. हैदराबादमधील भूकंपशास्त्र संस्थांच्या मदतीने या भागाचा अभ्यास केल्यास भविष्यातील धोके ओळखता येऊ शकतात. हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या लिगो प्रकल्पावरही या भूकंप मालिकेचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा भाग भूकंपमुक्त मानला जात होता मात्र २०२० नंतर येत असलेल्या धक्क्यांमुळे आता या प्रकल्पाबाबत पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. भूकंपाबाबत अचूक पूर्वसूचना देणारी कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले मात्र काही प्राणी आणि पक्षी भूकंपाच्या आधी संवेदनशील प्रतिक्रिया देत असतात, असे निरीक्षण आहे.
मराठवाड्यातील या धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहणे तसेच प्रशासनाने तातडीने वैज्ञानिक पातळीवर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात विविध भागात वेळोवेळी भूकंपाचे धक्के नोंदवले गेले असून काही घटना अत्यंत विनाशकारी ठरल्या आहेत. १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ६.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्या आधी १९६७ मध्ये साता-यातील कोयना परिसरात ६.५ तीव्रतेचा धक्का बसला होता. अलिकडे मराठवाडा व विदर्भातील हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत सौम्य ते मध्यम भूकंप वारंवार होत आहेत. पालघर, नाशिक आणि पुणे परिसरातही हलक्या धक्क्यांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते कोयना-वारणा पट्टा भूकंप प्रवण असून भूकंपरोधक बांधकाम आणि सतर्कता आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक भागांत शनिवारच्या भूकंपाचा धक्का जाणवला. हिंगोली जिल्ह्यातील शिंदे पांगरा हे भूकंपाचे केंद्रस्थान असल्याचे सांगण्यात येते. या परिसरात अनेक घरांना तडे गेले आहेत. काही गावातील सार्वजनिक सभागृहांना तसेच मंदिरांना तडे गेले आहेत. पांगरा शिंदे हे गाव भूकंपाच्या केंद्रस्थानी आहे की नाही हे अद्याप निश्चित नाही.
कारण केंद्र असेल त्या भागात नुकसान कमी असते; पण भूकंपाचा धक्का मोठा होता. हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे धक्के यवतमाळ जिल्ह्यातही बसले. मराठवाड्याच्या सीमावर्ती भागांना पुसद शहर आणि वसंतनगर परिसरालाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने जिल्ह्यात कोठेही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र या नैसर्गिक घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात होता. जमिनीच्या आत काही किलो मीटर खोलीवर झालेल्या या हालचालींमुळे हिंगोलीसह यवतमाळ, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांत कंपने जाणवली. ग्रामीण भागात भांडी वाजणे, खिडक्यांची तावदाने थरथरणे
यासारखे प्रकार घडले. भूकंपानंतर सोशल मीडियावर विविध अफवांना ऊत आला. भूकंप हा नैसर्गिक बदल असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जर पुन्हा धक्के जाणवले तर इमारतीमध्ये न राहता तात्काळ मोकळ्या मैदानात अथवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला पाहिजे. लिफ्टचा वापर टाळला पाहिजे.
भूकंप हा नैसर्गिक बदल आहे. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होते अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यासारख्या घटना घडतात यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी असे म्हणतात तर भूकंपनाभीच्या अगदी वर म्हणजेच भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. भूकंप हा सर्वांत वाईट नैसर्गिक धोक्यांपैकी एक आहे. भूकंपामुळे व्यापक प्रमाणात विनाश आणि मानवी जीवांचे नुकसान होते. भूकंप प्रामुख्याने पृथ्वीच्या कवचाच्या कोणत्याही भागामध्ये समतोल नसल्यामुळे होतो. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या पांगरा शिंदे गावात भूकंपामुळे सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत म्हणे. या गावात आई-वडील आपली मुलगी देण्यास तयार नाहीत म्हणे. या गावातील नागरिकांना शेती क्षेत्र कमी असल्याचे तसेच सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने गावात नातेसंबंध करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे. या सामाजिक समस्यांमुळे गावात दोनशेहून अधिक तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत म्हणे!

