कॉक्रोच जनता पार्टीचे बॅकअप अकाऊंटही हटविले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि देशभरात अभिजीत दीपके चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची देशभर चर्चा सुरु आहे. अभिजीत दीपके हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. दीपके यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांचे इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याची माहिती दिली. याशिवाय बॅकअप म्हणून काढलेले कॉक्रोच जनता पार्टीचे खातेही हटवण्यात आल्याची माहिती दीपके यांनी शेअर केली.
अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे अकाऊंट सुरू केले. दीपके यांच्या या पार्टीच्या फॉलोअर्सच्या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाल्याचे पाहायला मिळते. इन्स्टाग्रामवर सीजेपीचे २ कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. मात्र, अभिजीत दीपके यांनी त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. दीपके यांचा दावा खरा ठरला असून त्यांचेच इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. याशिवाय बॅक अप म्हणून काढलेले कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम खातेही हटवण्यात आले आहे.
















