रडार सिस्टम उद्ध्वस्त केल्याचा दावा
तेहरान : वृत्तसंस्था
पश्चिम आशियात आधीच सुरू असलेला तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणने अमेरिकेच्या विरोधात थेट युद्ध पुकारत आखाती देशांमधील अमेरिकन एअरबेसवर भीषण हल्ला केल्याचा दावा केला. या हल्ल्यात अमेरिकेची पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सोमवारी केला. या हल्ल्याचा एक कथित व्हिडीओही समोर आला असून यामुळे जागतिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.
लष्करी अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेकडून इराणवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हे सर्वात मोठे लष्करी ऑपरेशन राबवण्यात आले. इराणच्या सैन्याने आणि आयआरजीसीने सलग ४८ तास शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून हा हल्ला केला. हा संपूर्ण हल्ला तीन टप्प्यांत करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात इराणच्या एरोस्पेस फोर्सने जॉर्डनमधील अमेरिकेच्या प्रिन्स हसन एअरबेसला निशाणा बनवले. अमेरिकेने आपले ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून आंतरराष्ट्रीय हवाई नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला. दुस-या टप्प्यात इराणच्या अत्याधुनिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी बहरीनमधील अमेरिकेच्या शेख ईसा एअरबेसवर जोरदार मारा केला. तिस-या टप्प्यात आणि सर्वात घातक हल्ला कुवेतमध्ये झाला. येथे अमेरिकेच्या अली सालेम एअरबेसवरील मुख्य इंधन टाक्या आणि महाशक्तीशाली पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा इराणने केला.
इराणची पुन्हा नाकाबंदी
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे वर्चस्व असून, ही सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली आहे. ती इराणसोबत असताना आणि नसतानाही खुली असेल, असे म्हटले. इराणची नाकाबंदी पुन्हा लागू केल्याचेही अमेरिकेने म्हटले.
इराणवगळता होर्मुझ
अन्य देशांसाठी खुला
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी निष्पक्षपणे खुली असून त्याचा वापर सुरू आहे. ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संरक्षक म्हणून अमेरिका काम करणार असून, प्रत्येक जहाजावर २० टक्के दराने टोल आकारला जाईल, असे ट्रम्प म्हणाले.
इराणच्या विमानावर
सौदी अरेबियाचा हल्ला
मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष तापला आहे. त्यातच येमेनमध्ये सौदी अरेबियाने थेट सना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असलेल्या विमानावर हल्ला केला. हे विमान इराणच्या महान एअरवेजचे आहे. विमान उतरत असताना हल्ला केल्याचा आरोप येमेनमधील हुती दहशतवादी संघटनेने केला.
















