लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन वाढवणा (ता. उदगीर) यांच्या पथकाने तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, चारचाकी वाहने व दुचाकी असा एकूण २३,३५,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नळगीर शिवारातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली काही व्यक्ती पैसे लावून बेकायदेशीररीत्या तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती वाढवणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात वाढवना पोलिसांनी दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास तात्काळ छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान नामदेव प्रल्हाद पवार (वय २५ रा. नळगीर तांडा, ता. उदगीर), संजय काशीराम राठोड (वय ५१ रा. धर्मा तांडा (गुत्ती), ता. जळकोट), दगडोबा गोविंद गोतावळे (वय ५२ रा. सोनावळा, ता. जळकोट) यांना अटक करण्यात आली असून रंजीत मरेपा मोटेवाड, रा. जळकोट, सुदर्शन देव मूलशंकर कापसे, रा. नळगीर, ता. उदगीर, दीपक सूर्यकांत गायकवाड, रा. नळगीर, ता. उदगीर, संतोष माधवराव बिजले, रा. नळगीर, ता. उदगीर, गणेश बालाजी पेदावाड, रा. नळगीर, ता. उदगीर. हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदर छाप्यात तिर्रट जुगाराचे साहित्य, रोख रक्कम १५ हजार ५००, २० लाख ५० हजारांच्या दोन चारचाकी वाहने व २ लाख ७० हजाराच्या चार दुचाकी असा एकूण २३ लाख ३५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन वाढवणा गुरनं. २२०/२०२६ अन्वये कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मधुकर हालसे असून, गुन्हा पोलीस अंमलदार नागरगोजे यांनी नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अमलदार इकरम उजडे करीत आहेत.
















