बजावली नोटीस, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यास विरोध झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या निवडीला आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. मात्र, २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा केली. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली. आता याच निवडीला राष्ट्रवादी पक्षातून आक्षेप घेण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना ९ जुलै रोजी नोटीस बजावली असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे.
पक्षाच्या अध्यक्षांसह
वरिष्ठ नेत्यांना नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रपुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली. यात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचे म्हणत ती रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.
















