नवी दिल्ली : राजस्थान, गुजरात आणि वायव्य भारतातील काही भागांत गेल्या ३-४ दिवसांत मंदावलेला मान्सून २० जुलैपासून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून पूर्व, मध्य आणि ईशान्य भारतावर दाट ढगांचे आच्छादन असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बांगलादेश आणि ईशान्य भारतावर तयार होत असलेली चक्रीवादळाची प्रणाली (सायक्लोनिक सिस्टीम) आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमेकडील विक्षोभ) यांच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज उत्तर प्रदेश आणि बिहारसह १८ राज्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, पुढील ६-७ दिवसांत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्ये आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी चांगला ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण १२६ रस्ते सध्या बंद आहेत. स्यानचट्टीजवळील ऋषिकेश-यमुनोत्री महामार्ग रविवारी सलग तिस-या दिवशीही बंद राहिला.
हरियाणात, हिमाचल प्रदेशातून येणा-या पाण्यामुळे यमुना आणि मार्कंडा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसामुळे दिल्लीतील यमुनेच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे; रविवारी नदीत अंघोळ करताना प्रवाहाच्या तीव्र वेगामुळे चार मुले वाहून गेली.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
हवामान विभागाने, राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
















