Homeमहाराष्ट्रउन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; शेतकरी दुहेरी संकटात

उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; शेतकरी दुहेरी संकटात

नाशिक : प्रतिनिधी
कृषीसंपन्न म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका सध्या उन्हाच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. एकीकडे तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडल्याने अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे कांद्याचे कोसळलेले बाजारभाव आणि वाढती मजुरी यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषत: तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी निसर्ग आणि अर्थकारणाच्या कात्रीत सापडला आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे शेतात उभे राहणेही कठीण झाले असताना कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतक-यांना उन्हातच काम करावे लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पावसाळ्यात वापरली जाणारी छत्री आता उन्हापासून बचावासाठी वापरावी लागत आहे. शेतात मजूर आणि महिला डोक्यावर छत्री धरून कांदा उपटताना दिसत असून हे चित्र अत्यंत विदारक आहे.

कांदा पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. लागवड, खते, औषध फवारणी आणि मशागत मिळून शेतक-याला एकरी किमान ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. मात्र, बाजारात मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने हा खर्चही परत मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत गुंतवलेल्या भांडवलाच्या ५० टक्के रक्कमही हाती पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेला कांदा मातीमोल दराने विकावा लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

मजुरीचा वाढता बोजा
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कामाचे तास कमी झाले असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी मजुरीचे दर वाढले आहेत. कष्टाने कांदा काढूनही मजुरी देताना शेतक-यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उष्माघाताचा धोका वाढला
तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही शेतकरी आणि मजूर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.
एकूणच, जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, शासनाने तातडीने दखल घेऊन ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR