जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील गव्हाण गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पाण्याचे टँकर सुरू झाल्यानंतर आता पाणीटंचाईसाठी संर्घष करीत असलेल्या गावास काही अंशी दिलासा मिळणार आहे. या गावास मोठ्या पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. गावाशेजारी असलेल्या नदीपात्रामध्ये सार्वजनिक विहीर होती. या विहिरीतूनच गावास पाणीपुरवठा होत होता मात्र गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून हे पात्र कोरडेच आहे यामुळेच विहीरही कोरडी पडली आहे. या कारणाने गावक-यांना व्यवस्थित पाणी मिळत नव्हते. याबाबत दैनिक एकमतने ‘गव्हाण येथे प्रथमच तीव्र पाणीटंचाई नदीपात्रात खड्डा खोदून गावक-यांना पाणीपुरवठा’ या सदराखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृताची तातडीने जळकोट येथील पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली, तात्काळ टँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आला व यानंतर हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्याकडे पाठविण्यात आला . तात्काळ उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी गव्हाण गावास टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली .
नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती जळकोट तालुक्यातील गव्हाण गावची झाली आहे. अगदी गावाच्या जवळून जळकोट तालुक्यात सर्वात मोठी असलेली तिरु नदी वाहते. याच नदीवर उच्च पातळी बंधारा उभा करण्यात आलेला आहे मात्र हा बंधाराही अनेक महिन्यापासून कोरडाचा आहे. येथील गावक-यांनी पाटबंधारे विभागास तिरु नदीपात्रात तिरू प्रकल्पाचे पाणी सोडावे अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले याचा परिणाम तिरू नदीकाठच्या गावांना सोसावा लागत आहे .
तालुक्यातील गव्हाण गावाला कधीही पाणीटंचाई जाणवली नाही एवढी पाणीटंचाई यावर्षी जाणवत आहे. विहिरीतले पाणी संपल्यामुळे ग्रामपंचायतीने नदीमध्ये खोल खड्डे करून यामधील पाणी विहिरीत सोडले व विहिरीतील पाणी उपसून ते नळाद्वारे सोडण्याचा शेवटचा प्रयत्नही केला होता मात्र या खड्ड्यामधील पाणी गावक-यांना कसे पुरणार, यामुळे नळास ४ ते ५ दिवसांनी नळाला पाणी सोडण्याची वेळ ग्रामपंचायतवर आली होती. ही सर्व अडचण तसेच नागरिकांना होणारी पाण्याची टंचाई याबाबतचे वृत्त दैनिक एकमतने छापले होते. या बातमीची तात्काळ दखल जळकोट येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी यांनी घेतली. तात्काळ टँकरचा प्रस्ताव तयार करण्यात आला व हा प्रस्ताव मंजुरीसाठी उदगीर येथे पाठविण्यात आला व या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच गव्हाण गावासही टँकरने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती जळकोट तालुका पाणीटंचाई कक्ष प्रमुख सचिन काडवादे यांनी दिली.

