लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा जंगम समाज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व स्कॉलरशिप वितरण सोहळा-२०२६’ आयोजित करण्यात आला होता. दहावी, बारावी, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या समाजातील १६५ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या समाजातील ८५ गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे (स्कॉलरशिप) वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय स्वामी (चाकूर) होते तर स्वागताध्यक्ष म्हणून इंजि. नागेश अशोक स्वामी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार प्रवीण स्वामी (उमरगा), पाथरी मठाचे श्री श्री १०८ काशीनाथ स्वामी शिवाचार्य महाराज (बापू) तसेच भारतीय अभियांत्रिकी सेवेतील सनदी अधिकारी धानेश स्वामी हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, समाजसेवा आणि उच्च शिक्षणात यशस्वी होण्यासाठी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सोहळ्यास सुभाष (भीमाशंकर) स्वामी देवणीकर, विश्वनाथ सावके, इंजि. सोमनाथ बालकुंदे, षण्मुखानंद मठपती, सूर्यकांत पत्री, शिवलिंगण्णा मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय स्वामी, उपाध्यक्ष इंजि. सुहास स्वामी, सौ. जयश्री दयानंद स्वामी, सचिव मनमथ स्वामी, कोषाध्यक्ष डॉ. सचिन बालकुंदे, स्वागताध्यक्ष इंजि. नागेश अशोक स्वामी, व्यासपीठ प्रमुख दयानंद कोंकलगे, महिला कार्याध्यक्ष ज्योती स्वामी, युवासंपर्क प्रमुख महेश सुगावे, दीपक मठपती तसेच प्रतिष्ठानच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमास लातूर जिल्ह्यास परिसरातील जंगम समाजातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
















