अहमदपूर : प्रतिनिधी
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षीही सुस्वरे आळवीती’ या संत तुकारामाच्या उक्तीप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन निसर्गसंवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्याचे कार्य पंढरीच्या वारीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हाच संदेश अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामध्ये कार्यरत असलेले डॉ. अशोक कराड यांनी देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्यांचा महात्मा गांधी महाविद्यालयात अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. अशोक कराड यांनी लातूर सायकल क्लब च्यावतीने आयोजित अहमदपूर ते पंढरपूर अशी सायकल वारी दोन दिवसांमध्ये पूर्ण करून पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. प्रदूषण मुक्त वातावरणात निर्मल वारी, स्वच्छ वारी, सुंदर वारी, हरित वारी करून आरोग्य व निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे. याबद्दल विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे व मंडळाचे सचिव अॅड. पी. डी. कदम यांच्या हस्ते डॉ. अशोक कराड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव सुरेशराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अनिल जाधव, प्रभारी क्रीडा संचालक तथा सिनेट सदस्य डॉ. विनोद माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अनिल कांबळे, डॉ. यादव सूर्यवंशी, डॉ. के. एन. शिवलकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
















