चाकूर : प्रतिनिधी
सध्या चाकुरसह तालुका परिसरातील शेतक-यांना ‘पाऊस कधी येणार ?’ हा एकच प्रश्न पडला आहे. जून महिना संपला असला तरी मान्सूनने चाकूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक हजेरी तर काही ठिकाणी हजेरीच लावली नसल्यामुळे खरीप हंगामाची संपूर्ण तयारी करूनही बळीराजास पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
यंदाचा खरीप हंगाम वेळेवर सुरू होण्यासाठी आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. परिसरातील शेतक-यांनी शेतजमिनीची नांगरणी, वखरणी, कोळपणी, बांधबंदस्तिी आणि पेरीपूर्व मशागतीची बहूतांश कामे पूर्ण केलेली आहेत. यंदा सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होणार आहे मात्र, पेरणीसाठी आवश्यक असलेला सलग आणि समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतक-यांची चिंता दिवसोदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत असले तरी आद्याप एकही दमदार पाऊस झाला नाही मात्र पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतक-यांची लागवडीचा निर्णय पुढे ढकलला आहे. वेळेवर पाऊस झाला तर काही दिवसांतच शेतात पेरणीची लगबग सुरू होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत पावसाची हजेरी कमी
गतवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात परिसरात दमदार पाऊस झाला होता. जिल्हाभरात पावसाचे दमदार आगमन झाले होते. गेल्यावर्षी या काळात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सरींनी संपूर्ण जिल्हा ओला चिंब झाला होता. ज्यामुळे शेतक-यांच्या पेरण्या ७० टक्क्याहून आधिक पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र जुलै महिन्याची १३ तारीख आली मात्र गतवर्षीच्या तुलनेत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात यंदा ५७ हजार ९३८ हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ४५ हजार ६७५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड प्रस्तावित आहे. यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे अनियमित वितरण, लांब पावसाचा खंड, तसेच पिकाच्या वाढीच्या काळात पावसाची कमतरता अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
















