जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील कुणकी रोड, बसवेश्वर चौक येथील माऊली किराणा जनरल स्टोअर्समध्ये रविवारी (दि. १२ जुलै २०२६) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याची घटना घडली. या चोरीत सुमारे दिड लाख रुपयांचा किराणा माल लंपास करण्यात आला तसेच रोख १८ हजार रुपये लंपास करण्यात आले असून व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानाचे मालक तुळशीराम किशनराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून ते गावाकडे गेले होते. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांंनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि विविध प्रकारचा किराणा माल चोरी करून नेला. सदर किराणा दुकानदाराने दोन दिवसापूर्वीच आपल्या किराण दुकानांत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला होता चोरी गेलेल्या मालामध्ये विविध कंपन्यांचे सोयाबीन तेलाचे डबे, २६ किलोचे १६ तांदळाचे कट्टे , १४ किलोचे १५ तेलाचे डबे, ५ किलो काजू, ५ किलो बदाम, बाजरी, जिरा पोते ३० किलो, श्रीफळ पोते २, तसेच इतर किरकोळ किराणा साहित्य यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची अंदाजे किंमत दिड लाख रुपये एवढी आहे.
फिर्यादीनुसार, ४ अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या सहाय्याने माल नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी चोरीचा तपास करून चोरी गेलेला माल परत मिळवून द्यावा तसेच संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तुळतीराम जाधव यांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापा-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी व्यापा-यांकडून होत आहे.
















