लातूर : एजाज शेख
यंदा पाऊसच नाही, त्यामुळे जलस्त्रोतात पाणी नाही, पाणी नाही म्हणुन खरीप नाही. खरीप नाही म्हणून चारा नाही, अशी भीषण दुष्काळाची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात फक्त ३,९९२.२६६ मेट्रीक टन चारा, वैरण उपलब्ध आहे. दर महिन्याला १९९६.१३३ मेट्रिक टन चारा, वैरण लागते. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चारा केवळ ६० दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. त्यानंतर म्हणजेच डिसेंबरनंतर चारा टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार १८३ लहान-मोठी तर १ लाख ५४ हजार शेळ्या-मेंढ्या आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचा विचार करता दर महिन्याला अंदाजे १९९६.१३३ मेट्रिक टन चा-याची आवश्यकता भासते. जिल्ह्यामध्ये सध्या डिसेंबरपर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर जिल्ह्यातून होणारी चा-याची आवकही बंद झाल्यामुळे चारा टंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी व जनावरांच्या चा-याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. शासनाने चारा छावण्या न उभारता चारा दावणीला द्यावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. कारण चारा छावणीचा उपयोग दुभती जनावरे आणि कामाच्या बैलांना होत नाही. चारा छावणी गैरी जनावरे पोसण्याचे ठिकाण बनते. तसेच चारा छावणी म्हटले की, भ्रष्टाचाराचे नवे कुरण तयार होते. त्यामुळे शासनाने पशुपालकांना कानात बिल्ला व नोंदणीप्रमाणे चारा किंवा चा-याचा पैसा शेतक-यांना द्यावा, अशीही मागणी आहे.
पशुधनाच्या चा-याची जशी भीषण परस्थिती आहे. तशीच परस्थिती पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची आहे. जिल्ह्यात कुठेही पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक पानवठे नाहीत. त्यामुळे पशुधन मालकच सध्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे. चारा आणि पाणी चाराटंचाईचा पशुधन विक्री व जनावरांच्या किंमतीवर काय परिणाम झाला आहे. पशुधनमालक टंचाईमुळे पशुधन विकण्याच्या मनस्थितीत आहेत. काही ठिकाणी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आणलेल्या जनावरांची संख्या लक्षणिय आहे.
सर्व प्रकारचा चारा, वैरण, पिकांचे अवशेष जिल्ह्याबाहेर विक्रीस पूर्णत : बंदी
पावसाच्या तुटीमुळे चारा आणि वैरणीचे उत्पादन अत्यंत कमी होणार असून पशुधनाला सकस आहार मिळण्यासाठी सोयाबीनचे कुटार, ज्वारी व मक्याचा कडबा, गव्हाचे काड, हरभरा व तुरीचे भुसकट तसेच उसाचे पाचट व चोथा उपयुक्त ठरणार आहे. असे असताना जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांकडून हे अवशेष मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे स्थानिक पशुधन धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या आदेशानुसार, लातूर जिल्ह्याच्या महसुली सीमा ओलांडून कोणत्याही वाहनाद्वारे इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर चारा अथवा पिकांच्या अवशेषांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई राहील. तसेच बायोकोल किंवा इतर औद्योगिक प्रकल्पांना इंधन म्हणून चारा व भुशाची साठवणूक व खरेदी करता येणार नाही, कारण हे सर्व अवशेष केवळ पशुधनाच्या वापरासाठीच राखीव राखले जातील.
















