लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील ममदापूर येथील शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर सुतळी बॉम्ब निर्मितीच्या ठिकाणी लातूर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले बॉम्ब आणि निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
ममदापूर येथील चंद्रकांत धनवे यांच्या शेतातील रस्त्यालगत असलेल्या १५ बाय ५० फूट आकाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच शेडलगतच्या मोकळया जागेत सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले सुतळी बॉम्ब, सुतळी, कागद, सल्फर तसेच बॉम्ब निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. यावेळी सहा महिला कामगार आणि मुकादम लिंबराज गणपती मोरे (वय ४२, रा. ममदापूर, ता. लातूर) उपस्थित होते.
प्राथमिक चौकशीत या कारखान्याचा मालक म्हणून आसिफ रसूल शेख (वय ३२, रा. ताजुद्दिन बाबा दर्गा रोड, आंबेडकर चौक, लातूर) यांचे नाव समोर आले आहे. सुतळी बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक परवान्याबाबत चौकशी केली असता, संबंधितांकडे परवाना उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आवश्यक परवान्यांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, उपलब्ध साहित्याची मोजणी व जप्ती आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४, स्फोटक पदार्थ नियम, २००८ तसेच तपासात निष्पन्न होणा-या अन्य लागू कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
















