निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याची पातळी खालावल्याने शेतीसह पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पाणीटंचाई आणि चा-याच्या वाढत्या चिंतेमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. उदरनिर्वाहाचे साधन असलेली जनावरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेक शेतकरी मोजकीच दुधाळ जनावरे ठेवून इतर जनावरे कवडीमोल किमतीत विकत आहेत. त्यामुळे पशुधनाच्या बाजारमूल्यावरही परिणाम होत असून, दुष्काळाच्या झळा आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसू लागल्या आहेत. निलंगा तालुक्यात लहान-मोठी मिळून ८७ हजार ८२२ जनावरे आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. शरद ज्ञानोबा गोरे यांनी दिली. खरीप व रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र आणि शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या बियाण्यांच्या आधारे चा-याच्या उपलब्धतेचा अंदाज काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
चारा बचतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न
जनावरांना निकृष्ट चारा सकस करून देणे, मुरघास तयार करणे, ओला चारा साठवणे आणि कडबा कुट्टीचा वापर वाढविणे याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत. कडबा कुट्टीमुळे चा-याची सुमारे ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. त्यासाठी अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिकही शेतक-यांना दाखविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. जी. वसमतकर यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली.
















