लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फÞुटी पुतळा आणि स्मारकाच्या संदर्भाने भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या नेतृत्वात बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने बाभळगाव निवासस्थान येथील झालेल्या या भेटीत स्मारकाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी हैदराबाद येथील स्मारकाप्रमाणे हे स्मारक भव्य दिव्य करावे, प्रशासन या स्मारकाच्या संदर्भाने पारदर्शकता आणि स्पष्टता पाळत नाही, त्यामुळे समाजासमोर या स्मारकाचा प्रारूप आराखडा प्रस्तुत करण्यास सांगावे, स्मारकाचा विस्तार करून त्यासाठी अधिकचा निधी मंजूर करून घ्यावा आदी मागण्या असलेले निवेदनही या शिष्टमंडळाने यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक लातूरात होत आहे याचा आम्हाला आनंद आहे, मात्र, मंजूर १० कोटी निधी मधून कोणती कामे होणार आहेत? एकूण प्रकल्प किती रकमेचा आहे? या संदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती जाहीर केली जात नाही, ती माहिती जाहीर करायला सांगावे. सध्या काम चालू असलेली जागा अत्यंत अपुरी आहे ती वाढवून घ्यावी, चबुत-याची उंची २० फुटापर्यंत वाढवावी, भव्य दिव्य पुतळ्यासोबतच स्मारक परिसराच्या विकासाचा एकत्रित प्रकल्प आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, त्यानंतरच हे काम होईल हे पहावे, कोणत्याही परिस्थितीत निधीअभावी हे काम अर्धवट राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे यावेळी आमदार अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळातील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपलीही शिष्टमंडळाच्या सूचनेप्रमाणेच भूमिका आहे, असे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणी सोबतच या संपूर्ण परिसराचा एकत्रित विकास आराखडा तयार करावा, या परिसरात असलेल्या सर्व व्यवस्थांचे पुनर्नियोजन करावे, या परिसरात पुन्हा पाणी साचणार नाही
यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करावी, आदी सूचना आपण यापूर्वीच दिल्या असल्याची माहिती शिष्टमंडळाला यावेळी त्यांनी
दिली.

