लातूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ऊस, फळबागा, भाजीपाला आणि अन्य शेतीपिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे. शेतक-यांवर ओढवलेल्या या परिस्थितीची तातडीने दखल घेत लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून तावरजा मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
तावरजा मध्यम प्रकल्प हा परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर तावरजा व लगतच्या गावांचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. सद्यस्थितीत कालव्याच्या दुरुस्तीअभावी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून शेतक-यांना सांगण्यात येत आहे. मात्र धरणामध्ये पाणी असतानाही पाण्याअभावी शेतातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. पशुधनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने शेतक-यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत परिसरातील अनेक शेतक-यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. याची तातडीने दखल घेत माजी आमदार धिरज देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून सद्यस्थितीकडे लक्ष वेधले. पाण्याअभावी शेतक-यांचे अतोनात नुकसान होत आहे. पिके करपून जात आहेत. पशुधनासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले असल्याने तात्काळ कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावे, असे पत्रात नमूद केले आहे.

