Homeलातूरपंचायत समितीवर लाभार्थ्यांचा धडक मोर्चा

पंचायत समितीवर लाभार्थ्यांचा धडक मोर्चा

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप करीत संतप्त घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. अनेक महिन्यांपासून घरकूल मंजूर असूनही प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने तसेच अनुदानाच्या हप्त्यांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
      मोर्चात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी ‘घरकुल द्या, अन्यथा उत्तर द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. काही ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत तर काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळूनही पुढील निधी मिळत नसल्यामुळे बांधकाम रखडल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रलंबित घरकुल प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, मंजूर लाभार्थ्यांना वेळेत निधी उपलब्ध करून द्यावा, बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन द्यावे, कामात विलंब करणा-या संबंधितांवर कारवाई करावी, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.  लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना घरकुल योजनेवरच त्यांचा मोठा आधार आहे. त्यात आता पावसाळा तोंडावर आला असून कुटूंब उघड्यावर आहे मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावेळी जि.प. सदस्य माणिक गायकवाड व पं.स.सदस्य हमीद पटेल यांच्यासमोर आंदोलकांनी मागण्या मांडल्या व प्रलंबित हप्ते वेळेत मिळावे यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली असता जि.प. सदस्य माणिक गायकवाड व पं.स.सदस्य हमीद पटेल यांनी आंदोलकांना शांत करीत वरिष्ठांशी संपर्क साधला व डिएसी बाबतची अडचण दूर करून प्रलंबित हप्ते तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR