Homeलातूररासायनिक खतांसाठी ‘अ‍ॅग्रिस्टॅक’वर नोंदणी करा

रासायनिक खतांसाठी ‘अ‍ॅग्रिस्टॅक’वर नोंदणी करा

लातूर : प्रतिनिधी
पश्चिम आशियाई देशांतील सद्यस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानुसार रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार, राज्य शासनाने कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या  आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, जागतिक बाजारपेठेतील खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्ह्यातील शेतक-यांनी पारंपरिक रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यामुळे केवळ  जमिनीची सुपीकता टिकणार नाही, तर उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना मिळेल.
जमिनीचे माती परीक्षण करून खतांचा संतुलित वापर करावा
शेतक-यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खते, हिरवळीची खते आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. खतांच्या उपलब्धतेबाबत किंवा तांत्रिक अडचणींबाबत शेतक-यांनी आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बदलत्या जागतिक परिस्थितीचा विचार करून आणि शासनाच्या धोरणांना प्रतिसाद देऊन नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR