लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा मंदावला असून, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर आता राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, मराठवाड्यासह अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. लातूर जिल्ह्यात तर हवामानाने वेगळेच रुप धारण केलेले दिसत आहे. पावसाळ्यात उन्हाळा अशी काहींशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल-मे सारखी परिस्थिती आहे. सोमवारी दुपारी लातूरचे तापमान ३८ अंशसेल्सिअसपेक्षा जास्त होते. त्यामुळे घामाच्या धारा निघत होत्या. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७०६ मिमी असून, आज अखेर १२१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या सर्वसाधारण १३५ मिमी तुलनेत ९५ मिमी (सुमारे ७० टक्के) पाऊस पडल्याने जून महिना सामान्य राहिला आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या १६.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्पात १७.८८ टक्के पाणीसाठा तर निम्न तेरणा प्रकल्पात ३२.१६ १६ टक्के पाणीसाठा आहे. लातूर तालुक्यातील तावरजा प्रकल्पात १९.८५ टक्के, रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पात ३.३६ टक्के, रेणापूर मध्यम प्रकल्पात २३.१५ टक्के, उदगीर तालुक्यातील तीरु प्रकल्पात ०.०० टक्के, याच तालुक्यातील देवर्जन प्रकल्पात ७.९० टक्के, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्रकल्पात ९.७७ टक्के, याच तालुक्यातील घरणी प्रकल्पात १७.७१ टक्के तर निलंगा तालुक्यातील मसला प्रकल्प कोरडा आहे. या ८ मध्यम प्रकल्पांत केवळ १२.२५ टक्के पाणीसाठा आहे.
महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून लातूरचा उल्लेख केला जातो. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. मान्सूनचा पाऊस सुरु होण्याच्या अधीच जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प काटोकाट भरले होते. त्यानंतर मान्सूनच्या पावसाने धुमाकुळ घातला आणि शेतक-यांचे या पावसाने अतोनात नुकसान केले. पाऊस असूनही शेतक-यांच्या हाती काहींच पडले नव्हते. यंदा मात्र गतवर्षीच्या विपरीत परिस्थिती पहावयास मिळत आहे. यंदाच्या जुन महिन्यात सरासरीपेक्षा खुप कमी पाऊस पडला. जुलै महिन्यात तर उन्हाळा भासत आहे. एप्रिल-मे महिन्यासारखे तापमान आहे. सूर्य आग ओकत आहे. एकीकडे पाऊस नसल्याने धरणांत जलसाठा कमी आहे. तर दुसरीकडे कडक उन्हामुळे धरण जलसाठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होऊन आणखी पाणीसाठा कमी होत चालला आहे. अपु-या पावसावरच ज्या ज्या शेतक-यांनी धाडसाने पेरण्या केल्या आज त्या शेतक-यांच्या पेरण्या वाया जाण्याची वेळ आली आहे.
















