पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीजवळ विमान क्रॅश झाले आणि त्यात अजित दादांसह ५ जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला. दरम्यान अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून त्याच्या पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगातर्फे सुरू करण्यात आली आहे. याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदारयादी १० मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असेल.
विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बारामती विधासभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहेत. यासंदर्भातील चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता बारामतीची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे. विधासभेची पोटनिवडणूक त्या लढताना दिसतील.
पार्थ पवार राज्यसभेवर?
राज्यसभेच्या निवडणुकाही आगामी काळात होणार असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे समजतेय. नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात हा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

