Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र ‘रेड झोन’मध्ये

महाराष्ट्र ‘रेड झोन’मध्ये

उष्माघातामुळे ३ जणांचा मृत्यू; ३० वर्षांच्या तरुणाचे बस स्थानकावर निधन

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय. सकाळी सात वाजल्यापासूनच कडाक्याचे ऊन जाणवत असून राज्य उष्णतेच्या ‘रेड झोन’मध्ये आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश ‘अति उच्च उष्णता धोका’ श्रेणीत करण्यात आला आहे. उष्माघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकोला, हिंगोली आणि वाशिम या ठिकाणी उष्माघातामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत बस स्थानकावर ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर वाशिममध्ये ४ दिवसांपूर्वी उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ४० च्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे.

उष्माघातामुळे हिंगोलीमध्ये पहिला बळी गेला आहे. हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरात ३० वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. शेख रफिक शेख उस्मान असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात सध्या तापमानाने मोठा उच्चांक गाठला आहे, सकाळी आठ वाजल्यापासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होत आहे तर दुपारी चार वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४० अंश से. वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाशिममध्ये उष्माघातामुळे एकाचा मृत्यू
वाशिमच्या अनसिंग येथील नर्सरी परिसरात एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती अनसिंग पोलिस स्टेशन हद्दीतील शेलू बु. येथील केशव गाढे आहे. त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह ४ ते ५ दिवसा अगोदरचा असल्याचा अंदाज आहे.

सूर्य आग ओकतोय, काळजी घ्या..
मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र होरपळला आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्यांचे तापमान ४० च्या पार गेले आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. अकोला, नंदुरबारसह विदर्भातील ४ जिल्हे देशातील सर्वोच्च तापमानात आले आहेत. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना त्रास वाढत आहे. त्यामुळे राज्यात अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यात उष्माघाताचे १७ रुग्ण
मागील दीड महिन्यात ऊन वाढल्याने राज्यात उष्माघाताचे १७ पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत. जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR