जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास व जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी विविध राजकीय, सामाजिक आणि शेतकरी प्रश्नांवर भाष्य करताना सरकारच्या भूमिकेची माहिती दिली. लाडक्या बहिणींना रेशन दुकानांमार्फत साड्यांचे वाटप बंद करण्यापासून ते महिलांसाठी नव्या रोजगाराभिमुख योजनेची घोषणा, महायुतीतील समन्वय, पावसाअभावी निर्माण झालेली शेतक-यांची बिकट परिस्थिती तसेच विरोधकांवर टीका अशा अनेक मुद्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
लाडक्या बहिणींना साड्या मिळणे बंद झाल्याबाबत बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, सरकारकडे पैसे नाहीत म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. रेशन दुकानांमधून साड्यांचे वाटप करताना अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आता महिलांना दीर्घकालीन फायदा होईल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, अशी नवीन योजना सरकार राबविण्याचा विचार करत आहे. या योजनेवर खर्च अधिक आला तरी हरकत नाही, मात्र महिलांना कायमस्वरूपी लाभ मिळणे महत्त्वाचे आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन त्यानंतर एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. अशा चर्चांमध्ये मी सहभागी नाही. या विषयावर मुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय नेतृत्व स्तरावर चर्चा होत असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मागणीवर प्रतिक्रिया
शिवसेनेकडून केंद्रात तीन मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याच्या चर्चेवर ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थेट केंद्रीय नेतृत्वाशी संबंध आहेत. ते अमित शहा किंवा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करत असतील. याबाबत अधिक माहिती त्यांनाच असेल.
महायुतीत अर्थखात्यावर कोणताही वाद नाही
महायुतीमध्ये अर्थखात्याच्या वाटपावरून मतभेद असल्याच्या चर्चेचे त्यांनी खंडन केले. अर्थखात्यावरून कोणताही वाद नाही. हा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर होईल. मी स्वत: या संदर्भात कोणतीही माहिती ऐकलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल प्रकरण राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल नाराज असल्याच्या चर्चेवर महाजन म्हणाले, ‘हा अजित पवार गटाचा अंतर्गत पक्षीय विषय आहे. त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.’
















