छ. संभाजीनगर : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता संपूर्ण जगासह भारतालाही बसला आहे. युद्धाची झळ ग्राहकांना बसली आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. तर तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचवेळी आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅसवरील रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. शहरांतर्गत प्रवास आता महागणार आहे.
आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांत एलपीजी गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. एलपीजी गॅसचा दर ६१ रुपयांवरून थेट ७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षाचालक आणि संघटनांनी केली आहे.
नाशिकची तर्रीदार मिसळ महागण्याची शक्यता
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ बसली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने मिसळचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक गॅस काल २२०० रुपये तर आज २४०० रुपयांवर पोहोचले आहेत. पैसे देऊन देखील गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. दररोज गॅसचे दर वाढत असल्याने हॉटेल चालकांची डोकेदुखी वाढली आहे.

