32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रलाचारी मान्य करणार नाही..; प्रकाश आंबेडकर आक्रमक

लाचारी मान्य करणार नाही..; प्रकाश आंबेडकर आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही युतींचा जागावाटप फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी देखील मविआमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर करत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. या व्हीडीओमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी युतीच्या संदर्भात सल्ला दिला.

त्यांचा मी आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधातील होती, मीही लाचारी मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे येऊ दिले नाहीत. पण, जेथे चळवळीलाच लाचार केले जात आहे, लाचार करून संपवले जात आहे हे कधीही सहन करणार नाही,’’ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘शाहू-फुले-आंबेडकरी मतदारांना माझे आवाहन आहे. आपल्यामध्ये जिंकलो पाहिजे ही भावना आहे. पण, काही गोष्टी बोलू शकत नाही. पण अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती आहे. चळवळीचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो. आपण सार्वजनिक जीवनात राहतो. त्यामुळे सार्वजनिक आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल त्याला शाहू-फुले-आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असे मी गृहित धरतो’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR