38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाआरसीबीचा पंजाब किंग्जवर ४ विकेट्सनी विजय

आरसीबीचा पंजाब किंग्जवर ४ विकेट्सनी विजय

बंगळुरू : आयपीएल २०२४ हंगामातील सहावा सामना काल (दि. २५) एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर ४ विकेटस्नी धमाकेदार विजय मिळवला.

सलामीवीर विराट कोहलीच्या ४९ चेंडूंतील ७७ धावांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर यजमान आरसीबीने येथील आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्जचा ४ गडी राखून धुव्वा उडवला. या लढतीत पंजाबने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली, तर प्रत्युत्तरात आरसीबीने १९.२ षटकांतच ६ गड्यांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.

शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर स्कूपचा षटकार खेचत लक्ष्य आवाक्यात आणले. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर ५ चेंडूत ३ धावा, असे समीकरण होते. यावेळी कार्तिकने लाँगऑनचा सणसणीत चौकार फटकावत थाटात विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.

विजयासाठी १७७ धावांचे तुलनेने कडवे आव्हान असताना विराट कोहलीने ७७ धावांची आतषबाजी केली. मात्र, दुस-या बाजूने ठराविक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला सुरूच राहिल्याने आरसीबीचा संघ बॅकफूटवर फेकला जाईल, असे चित्र होते; पण याचवेळी कार्तिक व लोमरोर यांनी अवघ्या १८ चेंडूंत ४८ धावांचा झंझावात साकारत पंजाबच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. कार्तिक १० चेंडूंत २८ धावांवर, तर महिपाल लोमरोर ८ चेंडूंत १७ धावांवर नाबाद राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR