40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसकल मराठा समाज भुजबळांविरोधात देणार उमेदवार

सकल मराठा समाज भुजबळांविरोधात देणार उमेदवार

नाशिक : नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र मराठा समाजाची नाराजी भुजबळांवर असल्या कारणाने भुजबळांविरोधात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

दरम्यान, एकीकडे शिवसेना आणि भाजपची नाशिकच्या जागेवर जुंपली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांनी पुतण्या समीर भुजबळ किंवा आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने साता-यातील जागेचा दावा सोडला. मात्र त्याबदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकला गुरुवारी (दि. २८) झालेल्या सकल मराठा समाजाची बैठक नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये पार पडली. नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव-भगिनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटला. निवडणुकीत छगन भुजबळांच्या विरोधात मराठा उमेदवार द्या, मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणा-या भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, असे मनोगत या बैठकीत सकल मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले.

बैठकीचा अहवाल मनोज जरांगेंना पाठविणार
छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सकल मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. नाशिकच्या लोकसभा निवडणुकीसाठी सकल मराठा समाजाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. या बैठकीचा अहवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे. नाशिकमधून मराठा समाज कोणता उमेदवार देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता महायुतीतून उमेदवारी भुजबळांनाच मिळणार की हेमंत गोडसेंना? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR