35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ताधा-यांच्या इच्छाशक्तीअभावी लातूरच्या विमानसेवेला वांझपण

सत्ताधा-यांच्या इच्छाशक्तीअभावी लातूरच्या विमानसेवेला वांझपण

रेल्वेच्या हवेत लातूरची हवाई सेवा जमिनीवरच

विनोद उगिले
लातूर  :
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच लातूरला मंजूर झालेल्या रेल्वे बोगी कारखान्याच्या श्रेयाची पिपाणी होऊ घातलेल्या २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा उमेदवार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून वाजवली जात आहे. या लातूर रेल्वे बोगी प्रकल्पावरून भाजपात उद्भवलेल्या श्रेयाच्या लढाईत उड्डाण मारणा-या लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी व प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे लातूरच्या विमान सेवेला वांझपणा आला आहे. लातूर व शेजारील जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा असतानाही व उड्डाण योजना अमलात येऊनही कोट्यवधी रुपयांचा हा प्रकल्प धूळखात पडला आहे. त्यामुळे लातूरकरांची हवाई योजना जमिनीवरच राहिली आहे.
जे-जे नवे, ते-ते लातूरला हवे, असा संकल्प उराशी बाळगणारे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या अथक परिश्रमांतून लातूर हे शहर हवाई मार्गाशी जोडले गेले. १९९९ मध्ये लातूर मध्यवर्ती बसस्थानकापासून १६.५ कि. मी. अंतरावर पश्चिमेकडे ३५८.३० एकरांच्या जागेत विमानतळ उभारण्यात आले. येथे १४० दशलक्ष रुपये खर्च करून भव्य अशी टर्मिनल इमारत आणि धावपट्टी उभारण्यात आली. ९ वर्षांनंतर हे विमानतळ औद्योगिक वसाहतीकडे स्थलांतरित करण्यात आले. २००६ साली या विमानतळाच्या नूतनीकरणासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यानंतर लगेचच राज्य सरकारकडून हे विमानतळ रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स कंपनीकडे ९३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले. स्व. विलासराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न करून येथे किंगफिशर कंपनीची वर्षभरासाठी येथून नांदेडमार्गे मुंबईकरिता ८ दिवसांतून ३ दिवस नियमित विमान सेवा सुरू केली. वर्षभरानंतर किंगफिशर कंपनीने ही विमान सेवा बंद केली. या दरम्यान केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे अकाली निधन झाले. यानंतर मात्र एकाच वेळी ६ विमान थांबण्याची सोय असलेले लातुरातील हे विमानतळ बंद पडल्यात जमा झाले.
आता येथे फक्त आपत्कालीन विमान सेवाच सुरू आहे. लातूर व शेजारील जिल्ह्यातील नागरिकांची या विमानतळावरून नियमित विमान सेवा सुरू करावी अशी खूप दिवसांपासूनची नागरिक व व्यापा-यांची मागणी आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या स्थानिक पुढा-यांच्या पाठपुराव्याने हे विमानतळ व येथील विमान सेवा नियमित सुरू होऊ शकते. मात्र स्व. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर येथील माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, खासदार सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार यांनी किंवा इतर कोणत्याही स्थानिकच्या भाजपाच्या नावारुपाला आलेल्या एकाही पठ्ठ्याने यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत.
काही वर्षापूर्वी केंद्र शासनाने विमान प्रवास सर्वसामान्य माणसाच्या अवाक्यात आणण्याच्या तसेच विमानतळ असूनही सेवा सुरू नसलेल्या शहरांना विमान वाहतुकीच्या मार्गावर आणणे व नागरिकांना सदरील सेवा रास्त दरात उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने उड्डाण योजना अंमलात आणली होती. मात्र या शहरापेक्षा अधिक सोयीसुविधा असलेल्या व स्वप्नात येण्याअगोदर विमान सेवेचा लाभ मिळालेल्या लातूर जिल्ह्याला केवळ स्थानिकच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी व विमान प्रधिकरणाच्या उदासीनतेमुळे लातूरच्या विमान सेवेला वांझपणा आला आहे. यामुळे लातुरातील हा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प धूळखात पडला पडला आहे. वेळीच याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही तर हे विमानतळ केवळ चित्रपटांच्या शूटिंगसाठीच्या सेटपुरताच उरणार आहे.
डॉक्टरांकडून उपचाराची अपेक्षा…
लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रचाराच्या माध्यमातून लातूरच्या या विमान सेवेवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. धिरज देशमुख यांच्या सहकार्यातून निवडून येताच बंद पडलेल्या विमान सेवेवर उपचार करून विमान सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे; पण त्यांचा विजय होणे आवश्यक आहे.
तेव्हा असे वाटलेच नव्हते…
जेव्हा लातूर येथे विमानतळ उभारण्यात आले व या विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली स्व. देशमुखांकडून सुरू होत्या तेव्हा या विमानतळावर २००३ साली सिनेकलाकार अजय देवगण, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या पहिल्या जमीन या देशभक्तीपर हिंदी चित्रपटाची शूटिंग येथे झाली होती. या निमित्ताने हे विमानतळ जगभरात पोहोचले होते. तेव्हा हे विमानतळ व येथील विमान सेवा जमिनीवरच राहील, असे कधीच वाटले नव्हते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR