35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरउत्तर सोलापूरात भाजप-काँग्रेसमध्ये निकराची लढाई

उत्तर सोलापूरात भाजप-काँग्रेसमध्ये निकराची लढाई

रणजीत जोशी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याची २२ गावे मोहोळ विधानसभा मतदारसंघाला तर १०गावे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत. शहर उत्तरमध्ये कोंडी व खेडच्या ५ हजार ३५४ मतदारांचा समावेश आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर सोलापूर तालुका मोदी लाटेत भाजपसाठी सोपा झाला होता, पण राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये झालेले विभाजन, त्यामुळे निर्माण झालेले राजकारण आणि चर्चेतील मुद्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला परिश्रम घ्यावे लागणार आहे.

तालुक्यातील शरद पवार गटाचे बळीरामकाका साठे व काँग्रेसचे दिलीप माने हे २००९, २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारात उतरले आहेत. भाजपाचे आमदार सुभाष देशमुख व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सक्रिय झालेले दिसत नाहीत. युवक सोशल मीडियावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागले गेले आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक युवकांनीच हातात घेतल्याचे चित्र आहे. उत्तर तालुक्यात बळीरामकाका साठे व दिलीप माने यांचे दोन राजकीय गट आहेत. या दोघांचेच कार्यकर्त्यांचे तालुक्यात जाळे आहे. २००९, २०१४, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय होते.

२०२४ च्या निवडणुकीतही साठे व माने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. उद्धवसेनेचे संजय पौळ हेही पक्षादेश मानून पदाधिका-यांसह आघाडी धर्म पाळताना दिसत आहे. उत्तर तालुक्यातील २४ गावांत भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासोबत पक्षाचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांनी प्रचार दौरा केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी आधीपासूनच पक्की होती. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी अगोदरच शालिवाहन माने-देशमुख, भारत जाधव व तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांची पक्ष संघटना बांधली आहे. उत्तरर सोलापूर तालुक्यात भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते आणी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची तगडी टक्कर उत्तर सोलापूर तालुक्यात होणार असून विकासाचे प्रश्न,युवकांच्या रोजगाराचा प्रश्न या तालुक्यात मोठे आहेत.

मात्र यंदाच्या निवडणूकीत युवक मतदारांची भूमीका महत्वाची राहणार आहे.राष्ट्रवादी अजीत पवार गट आणी शिवसेना शिंदे गटाची ताकद भाजपसाठी उपयोगी ठरणार आहे.उत्तर सोलापूर तालुक्यात महायुतीकडून आमदार सुभाष देशमुख,आमदार यशवंत माने, जितेंद्र साठे,शहाजी पवार,राम जाधव आदी नेत्यांची भूमीका महत्वपुर्ण राहणार आहे तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार दिलीप माने,बळीराम साठे,भारत जाधव,संजय पौळ आदी नेत्यांची भूमीका महत्वपुर्ण राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR