किनगाव : वार्ताहर
किनगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू झाली मात्र मतदार याद्यामुळे गोंधळ उडाला कारण निवडणूक विभागाने पूर्वीच्या मतदार यादीचा फार्मुला वापरला असल्यामुळे मतदानाचा टक्का घसरला आहे. या निवडणुकीत ३५.११ टक्के मतदान झाले.
महसूल अधिकारी प्रशासनाची उदासीन धोरणामुळे मतदानास कात्री लागली असून भर उन्हात मतदारांना यादीतील गोंधळामुळे मतदान न करताच परतावे लागले आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहा टक्केही मतदान झाले नव्हते. याची जवाबदारी कोण घेणार असा सवाल मतदारांतून केला जात आहे. मतदान टक्केवारीचा धिंडोरा पिटणा-या महसूल अधिकारी, कर्मचा-यांच्या चुकीच्या कामामुळे या पोटनिवडणुकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महसूल अधिकारी कर्मचारी यांना ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ या म्हणीप्रमाणे मतदार याद्याचे काम झाल्याचे निदर्शनास आले. एकाच परिवारातील सदस्य असलेले मतदारांचे नावे एक सोडून दुस-याच प्रभागात आले तर अनेकांचे नावे महसूल कर्मचारी यांच्या चुकीने यादीतून गायबच झाले आहेत. त्यामुळे ११ वाजताच्या सुमारास तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांनी केंद्रावर भेट घेतली व मतदारांच्या शंकेचे निरसन करून महसूल विभागाने मोबाईल फंडा लावून निघून गेले.
मतदानाची गोंधळलेली स्थितीत सुधारणा झाली नाही. उलट या परिस्थितीचे खापर उमेदवारावर फोडून निघून गेले. मतदार याद्या प्रसिद्ध घाई गडबडीत आटपल्यामुळे आधीच सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असल्याने व पोटनिवडणूक असल्याने निवडणूक व महसूल विभागाने निवडणुकीचे गांभीर्य घेतले नसल्याचे मतदान केंद्रावर मतदार चर्चा करीत होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासन मोठा धिंडोरा पिटवते मात्र पोटनिवडणुकीतून अशा प्रकारच्या चुकीच्या याद्या कशा व कोणी केल्या आहेत याची चौकशी करण्याची मागणी किनगाव ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांतून केली जात आहे.

