Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या नवनिर्वाचित १० आमदारांनी घेतली शपथ

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित १० आमदारांनी घेतली शपथ

मुंबई : विधान परिषदेच्या१० नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी (ता. १४ मे) झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) नीलम गो-हे यांच्यापासून शपथविधीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेचे बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, त्यानंतर भाजपच्या प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी परिषदेतील आमदारकीची शपथ घेतली. परंतु, यावेळी आमदार बच्चू कडू यांच्याकडून शपथविधीच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे ५ सदस्य, शिवसेना शिंदे गटाचे २ सदस्य, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी एका सदस्याची आमदार पदी नियुक्ती झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी गुरुवारी झाला. यावेळी शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी आमदारकीची शपथ घेतली. परंतु, यावेळी त्यांनी शपथेव्यतिरिक्त भाषणही केले. ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, आज संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते, असे म्हटले.

नीलम गो-हे यांनी आभार मानल्यानंतर यावेळी मुख्य सचिवांनी सूचना करत नवनिर्वाचित सदस्यांना शपथेचा नमूना दिला आहे. त्यामुळे त्यांनी शपथेपूर्वी किंवा शपतेनंतर कोणत्याही नावाचा किंवा घोषणेचा उल्लेख करू नये, अशी विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांचे नाव शपथ घेण्याकरिता पुकारण्यात आले. बच्चू कडू यांनीही यावेळी शपथ घेतली. मात्र, त्यांनी मला थोडी सुविधा दिली पाहिजे, असे म्हणत भाषण करण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र, त्यांच्या या मागणीवर तत्काळ विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी ‘नाही.. सुविधा नाही कोणाला’ असे म्हणत त्यांना रोखले. मात्र, तरी सुद्धा कडू यांनी त्याकडे दुर्लक्ष करत ‘‘शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो आणि छत्रपती संभाजीराजेंना अभिवादन करतो,’ असे म्हणत मुख्य सचिवांकडून शपथेव्यतिरिक्त काहीही न बोलण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR