Homeराष्ट्रीयनीट पेपरफुटी २०२६: सीबीआयचा देशभरात धडाका; देशभरातून ६ आरोपींना अटक

नीट पेपरफुटी २०२६: सीबीआयचा देशभरात धडाका; देशभरातून ६ आरोपींना अटक

नवी दिल्ली/छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET (UG) २०२६ परीक्षा पेपरफुटीच्या सावटाखाली आली असून, या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अत्यंत वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत देशभरातून एकूण ६ मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, यात महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरमधील तरुणांचा समावेश आहे.

सीबीआयने जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगर अशा विविध ठिकाणांहून अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत त्यात शुभम खैरनार (नाशिक) हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा शुभम हा या साखळीतील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. धनंजय लोखंडे (अहिल्यानगर/राहुरी) पुण्यात वास्तव्यास असताना यानेच शुभमला कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवली होती. मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल (जयपूर) हे राजस्थानमधील वितरणाचे जाळे या कुटुंबाने हाताळल्याचा संशय आहे. यश यादव (गुरुग्राम) याचा हरियाणामधील व्यवहारांमध्ये याचा मोठा सहभाग समोर आला आहे.

तपासात असे उघड झाले आहे की, धनंजय लोखंडे याने कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका शुभम खैरनारला पाठवली. शुभमने ही प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांना विकत घेतली होती. त्यानंतर शुभमने करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली टेलिग्राम ग्रुपचा वापर करून ही प्रश्नपत्रिका हरियाणातील मध्यस्थांना १५ लाख रुपयांना विकली. ही साखळी पुढे राजस्थानपर्यंत पोहोचली, जिथे एका ‘गेस पेपर’च्या नावाने त्याचे वितरण करण्यात आले.

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्राच्या ‘शिक्षण पंढरी’ समजल्या जाणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत. लातूर पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. एका खाजगी क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेत तब्बल ४२ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा एका पालकाने तक्रारीत केला आहे. या हस्तलिखित पेपरची निर्मिती कोणी केली आणि तो कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खासगी क्लासेसची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मुख्य आरोपी शुभम खैरनार याच्या नाशिकमधील भाड्याच्या घरावर आणि नांदगावमधील मूळ घरावर सीबीआयने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या झडतीत मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. शुभमच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जात असून, त्याच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते (मात्र नंतर सोडून दिले).

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणि ‘एनटीए’ने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यामागे खालील प्रमुख तथ्ये कारणीभूत ठरली आहेत. राजस्थानमधील गेस पेपर सीकरमध्ये परीक्षेपूर्वी ४१० प्रश्नांचा एक संच ‘गेस पेपर’ म्हणून वितरित झाला होता.या संचातील १२० ते १३५ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जसेच्या तसे जुळले होते. सर्वाधिक प्रश्न रसायनशास्त्र (Chemistry) या विषयाचे होते.

तपासातील प्राथमिक पुराव्यांवरून ही केवळ योगायोग नसून नियोजित ‘पेपर लीक’ असल्याचे स्पष्ट झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. टक केलेल्या सर्व आरोपींना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले जाणार असून, सीबीआय त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, सरकार लवकरच पुनर्रचनेत असलेल्या नवीन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR