Homeराष्ट्रीयचहाचा कप महागणार!

चहाचा कप महागणार!

अमूलपाठोपाठ मदर डेअरीसह वेरका कंपनीचे दुध महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात महागाईचा भडका उडाला असून अमूल पाठोपाठ मदर डेअरी आणि वेरका कंपनीने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. १४ मे २०२६ पासून लागू झालेल्या या नवीन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडणार आहे.

देशभरातील सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. अमूलपाठोपाठ मदर डेअरी आणि वेरका यांसारख्या प्रमुख दुग्ध कंपन्यांनी दूधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती बजेटवर महागाईचा नवा बोजा पडला आहे. हे सर्व नवीन दर आज १४ मे २०२६ पासून सर्वत्र लागू झाले आहेत. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे.

मदर डेअरी आणि अमूलने दिलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या वर्षभरात शेतक-यांकडून दूध खरेदी करण्याच्या किंमतीत सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जनावरांच्या चा-याच्या आणि देखभालीच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. तसेच वाहतूक आणि प्रक्रिया खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांच्या खांद्यावर टाकला आहे.

वेरका दुधाचे दरही वाढले
पंजाब आणि हरियाणा भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणा-या वेरका दुधाच्या किमतीतही आता वाढ झाली असून चंदीगडसह ट्राय-सिटीमधील ग्राहकांना याचा थेट फटका बसणार आहे. नवीन दरवाढीनुसार, ५०० मिली फुल क्रीम दुधाचे पाकीट आता ३५ रुपयांऐवजी ३६ रुपयांना मिळणार आहे, तर ५०० मिली स्टँडर्ड दुधाचा दर ३२ रुपयांवरून वाढवून ३३ रुपये करण्यात आला आहे. याशिवाय, ५०० मिली गाईच्या दुधासाठी आता ग्राहकांना ३१ रुपये मोजावे लागतील. प्रामुख्याने उत्पादन खर्च आणि दूध संकलन दरातील वाढीमुळे कंपनीने प्रति लिटर २ रुपयांपर्यंत ही दरवाढ लागू केली आहे.

सर्वसामान्यांवर परिणाम
अमूल आणि मदर डेअरीने लागोपाठ ही दरवाढ केल्यामुळे दिल्ली, मुंबई, नोएडा आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट बिघडणार आहे. सकाळच्या चहापासून ते मिठाईपर्यंत सर्वच गोष्टी आता महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR