नवी दिल्ली : देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील ३२ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत डिग्री घेणा-या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल असे आयोगाने स्पष्ट केले. यूजीसीने विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेज अथवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. या ३२ विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटले आहे.
यूजीसीने सांगितले आहे की, यूजीसीच्या कलम २(एफ) आणि ३ अंतर्गत केवळ मान्यता प्राप्त संस्थांना डिग्री देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या संस्थाव्यतिरिक्त इतर कुठल्याही बनावट विद्यापीठ अथवा संस्थेकडून घेतलेली डिग्री बेकायदेशीर ठरेल असे त्यांनी म्हटले. यूजीसीच्या या यादीत दिल्लीत सर्वाधिक १२ विद्यापीठे बनावट असल्याचे पुढे आले आहे. दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात ४ विद्यापीठांना बनावट ठरवण्यात आले आहे. इतर राज्यातही काही शिक्षण संस्था कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने माहिती दिली आहे.
कोणत्या राज्यात किती बनावट विद्यापीठे?
दिल्ली – १२
उत्तर प्रदेश – ४
आंध्र प्रदेश – २
कर्नाटक – २
केरळ – २
महाराष्ट्र – २
पुदुच्चेरी – २
पश्चिम बंगाल – २
अरुणाचल प्रदेश – १
हरियाणा – १
झारखंड – १
राजस्थान – १
विद्यार्थ्यांना दिला विशेष सल्ला
यूजीसीने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशेष सल्ला दिला आहे. एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी या शैक्षणिक संस्थेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करावी. बनावट विद्यापीठांमध्ये दाखला घेतल्यास विद्यार्थ्याचा वेळ, पैसा आणि करिअर तिन्ही गोष्टी खराब होऊ शकतात. देशात उच्च शिक्षणाचा वाढवा विस्तार पाहता अनेक संस्था विना परवाना विद्यापीठे बनवत आहेत. त्यामुळे अशा संस्थांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे. योग्य माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा असे यूजीसीने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश
यूजीसीच्या या ३२ बोगस विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील २ विद्यापीठांचा समावेश आहे. त्यात नागपूर येथील राजा अरबी विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे.

