पनवेल : प्रतिनिधी
पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त हिंद-दी-चादर या विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येणा-या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य विभाग, घनकचरा व आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान व भांडार विभाग अशा विविध विभागांच्या वतीने त्यांच्याशी संबधित सर्व उपयुक्त सेवा-सुविधा उत्तम रीतीने देण्यावर भर देत आहेत.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमस्थळी सुमारे २६ लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३८ पार्किंगच्या ठिकाणी ११० टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. भव्य लंगरच्या ठिकाणी २ हजार लिटर क्षमतेच्या ३० सिटेंन्स टाक्या बसविण्यात आल्या आहेत. कार्यक्रम स्थळी पिण्याच्या पाण्याकरिता सिडको विभागामार्फत जलवाहिनी टाकून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रायगड सुरक्षा रक्षक मंडळ यांचे एकूण २५० सुरक्षा रक्षक ट्रॅफिक वॉर्डन व मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
आरोग्यसेवेसाठी उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ५ बीएलएस रुग्णवाहिका, ३ एएलएस अद्ययावत रुग्णवाहिका तैनात आहेत. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, फार्मासिस्ट, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासहित एकूण ८५० पेक्षा अधिक वैद्यकीय आरोग्य कर्मचारी कार्यक्रमस्थळी पूर्णवेळ कार्यरत आहेत.

