Homeअंतरराष्ट्रीयपाककडून डबल गेम सुरू

पाककडून डबल गेम सुरू

इराणचा खळबळजनक आरोप असीम मुनीर यांच्यावर संशयाची सुई

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्धात पाकिस्तानने मध्यस्ती केली. ८ एप्रिल रोजी झालेला युद्धविरामही पाकिस्तानशी चर्चा करून घेतला असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. तर, आजही पाकिस्तानशी चर्चा करून शस्त्रसंधी कायम ठेवली असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. एकीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानचे आभार मानले जात असताना इराणने मात्र पाकिस्तानवर दुहेरी खेळ खेळत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना थेट लक्ष्य केले आहे. अमेरिकन-इराण चर्चेत मध्यस्थी करणा-या पाकिस्तानवर तेहरानने हा आरोप केला असून, एका टेलिव्हिजन चर्चेदरम्यान करण्यात आलेली ही टीका दोन्ही देशांमधील बिघडत्या संबंधांचे संकेत देत आहे.

या वादाच्या केंद्रस्थानी इराणचा हा दावा आहे की, पाकिस्तान एकीकडे इराणी नेतृत्वाशी संवाद साधत असताना दुसरीकडे अमेरिकेशी हातमिळवणी करत आहे. तेहरानने या भूमिकेला ‘दुटप्पीपणा’ म्हटले आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपला औपचारिक वाटाघाटीचा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत अमेरिकेला पाठवला होता, परंतु अद्याप त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याऐवजी, इराणी माध्यमांचा असा आरोप आहे की, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वी मान्य केलेल्या इराणच्या १०-कलमी आराखड्याला इस्लामाबादने बाजूला सारले आहे आणि आता ते अमेरिकेच्या १५ ते १६ नवीन मागण्या लादत आहेत. तेहरानमधील विश्लेषकांच्या मते, हे पाकिस्तानच्या तटस्थ भूमिकेपासून दूर गेल्याचे लक्षण आहे. मध्यस्थीच्या नावाखाली पाकिस्तान इराणची बार्गेनिंग पॉवर(चर्चा करण्याची शक्ती) कमकुवत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आगामी काळात होणा-या चर्चेबाबतचे अहवाल तेहरानने फेटाळून लावले असून दुस-या फेरीच्या चर्चेत सहभागी होण्यास आपण नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे.

इराण-अमेरिका चर्चा
अमेरिका आणि इराणमधील चर्चेचा टप्पा सध्या नाजूक वळणावर आहे. दोन्ही बाजूंनी तांत्रिकदृष्टया चर्चेची दारे उघडी ठेवली असली तरी, महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांच्यात मोठे मतभेद आहेत. अमेरिकेने बुधवारी सध्याची युद्धबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली असून, तेहरानकडून एकात्मिक प्रस्तावाची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असले तरी, नियोजित चर्चा लांबणीवर पडल्यामुळे वाटाघाटी ठप्प झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR