टोकियो : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि अमेरिकेची संरक्षणवादी व्यापारी धोरणे याचा फटका आता जपानच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जपानला तब्बल १७०० अब्ज येन म्हणजेच सुमारे १ लाख कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सलग पाचव्या वर्षी जपानला व्यापार तुटीचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कात केलेल्या वाढीचा मोठा फटका जपानच्या वाहन उद्योगाला बसला आहे. जपानच्या वाहन निर्यातीत तब्बल १६ टक्क्यांची घसरण झाली असून अमेरिकेला होणारी एकूण निर्यात ६.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, मार्च महिन्यात निर्यातीत ११.७ टक्क्यांनी वाढ झाल्याने जपानची अर्थव्यवस्था सावरण्याचे संकेत मिळत असले, तरी चालू वित्तवर्षातील आकडेवारी धक्कादायक आहे.
इराण युद्धामुळे तेलाचा पेच
अमेरिकन टॅरिफच्या मारामारीत जपान सावरत असतानाच, इराण-अमेरिका संघर्षाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. जपान आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. इराण-अमेरिका तणावामुळे पश्चिम आशियातून होणा-या तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे नेफ्थावर आधारित औषधनिर्माण आणि प्लॅस्टिक उद्योगांवरही संक्रांत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२५४ दिवसांचा साठा, तरीही चिंता
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी २५४ दिवसांचा तेलसाठा उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, भविष्यातील अनिश्चितता पाहता, जपानने होर्मुझ जलडमरूमध्य या मार्गाला पर्याय म्हणून इतर मार्गांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जागतिक राजकारणातील या संघर्षाचा सर्वाधिक फटका जपानसारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशाला बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

