मिरा रोड (ठाणे): मुंबईला लागून असलेल्या मिरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी (२७ एप्रिल २०२६) पहाटेच्या सुमारास एका माथेफिरूने दोन सुरक्षारक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने आधी रक्षकांना त्यांचा धर्म विचारला आणि ‘कलमा’ पठण करण्याची सक्ती केली. रक्षकांना ते जमले नाही म्हणून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. या प्रकरणात आता दहशतवादी विचारसरणीचा कोन समोर येत असून महाराष्ट्र एटीएसने (ATS) तपास हाती घेतला आहे. पहात रहा एकमत डिजिटल
नया नगर भागातील एका निर्माणाधीन इमारतीजवळ राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन सुरक्षारक्षक पहाटे ४ च्या सुमारास कर्तव्यावर होते. यावेळी ३१ वर्षीय झैब जुबेर अन्सारी तिथे पोहोचला. त्याने सुरुवातीला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. मात्र, काही वेळातच त्याने दोघांना त्यांचा धर्म विचारण्यास सुरुवात केली. त्याने रक्षकांना जबरदस्तीने ‘कलमा’ म्हणायला लावले. जेव्हा त्यांना ते जमले नाही, तेव्हा झैबने जवळ असलेला चाकू काढून दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना झैबबद्दल धक्कादायक माहिती मिळाली आहे, झैब हा केमिस्ट्री विषयाचा शिक्षक असून तो ऑनलाइन क्लासेस घेतो. तो २०११ ते २०१९ या काळात तब्बल ८ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होता. २०१९ मध्ये भारतात परतल्यापासून तो मिरा रोडमध्ये एकटाच राहत होता. तपासात असे समोर आले आहे की, तो गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेटवर ‘ISIS’शी संबंधित व्हिडिओ पाहत होता आणि स्वतःच कट्टरपंथी बनला होता.
नया नगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या ९० मिनिटांत झैबला अटक केली. त्यानंतर जेव्हा त्याच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा पोलिसांचे धाबे दणाणले. त्याच्या घरी ‘ISIS’ बद्दलची हस्तलिखितं आणि चिठ्ठ्या सापडल्या. ‘जिहाद’, ‘लोन वुल्फ अटॅक’ आणि ‘गाझा’ संदर्भातील संशयास्पद नोट्स आढळल्या. त्याचा लॅपटॉप आणि मोबाईलमधूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. हा ‘लोन वुल्फ’ (एकट्याने केलेला) हल्ला होता की यामागे एखादी मोठी संघटना किंवा स्थानिक मॉड्यूल काम करत आहे, याचा शोध घेतला जात आहे.
