Homeराष्ट्रीयतामिळनाडूत 'थलपती' पर्व! विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; ६० वर्षांची द्रविडी मक्तेदारी मोडीत

तामिळनाडूत ‘थलपती’ पर्व! विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; ६० वर्षांची द्रविडी मक्तेदारी मोडीत

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे संस्थापक विजय (Thalapathy Vijay) यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या ऐतिहासिक क्षणासह तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेली DMK आणि AIADMK या दोन द्रविडी पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली होती. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या आकड्यासाठी त्यांना काँग्रेस (५), डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे.

विजय यांच्यासोबत त्यांच्या पक्षाच्या ९ इतर मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये ‘बुसी’ आनंद आणि के.ए. सेंगोट्टयन यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत विजय यांनी प्रस्थापित पक्षांना धूळ चारत सत्ता काबीज केली आहे. त्यांच्या या विजयाला ‘लोकांचा विजय’ म्हणून संबोधले जात आहे.

तामिळनाडूच्या इतिहासात १९६७ नंतर पहिल्यांदाच या दोन प्रमुख द्रविडी पक्षांव्यतिरिक्त तिसऱ्या पर्यायाने सरकार स्थापन केले आहे. शपथविधीनंतर स्टेडियमबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांनी आणि समर्थकांनी “थलपती, थलपती” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्री विजय यांनी शपथ घेतल्यानंतर तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले असून, “समाजकारण आणि पारदर्शक प्रशासन” हेच आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR