अनवर शेख
पाथरी : पाथरी शहराच्या राजकीय पटलावर सध्या ‘बॅनरनाट्य’ चांगलेच रंगले आहे. शिवसेना (शिंदे गट) पाथरी विधानसभा प्रमुख बालाजी कु-हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांचे फोटो झळकले होते. त्यानंतर ही वार्ता आ. राजेश विटेकर यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी संबंधीत नगरसेवकांना चांगलाच दम भरल्याची चर्चा असून त्यानंतर त्या नगरसेवकांना आपले फोटो बॅनरवरून हटवावे लागले असून काही ठिकाणी बॅनरच काढून घेण्याची वेळ आली. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळै शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ‘अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे पाथरी विधानसभा प्रमुख बालाजी कु-हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोईज मास्टर, शाखेर सिद्दिकी आणि आतीन फुलवरे यांचे फोटो झळकले होते. राज्यातील सत्तेत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचा भाग आहेत. या पार्श्वभुमीवर पाथरीत देखील या बॅनरकडे मैत्री म्हणून पाहिले जात होते. परंतू पक्षीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून याकडे ‘बंडखोरी’ किंवा ‘संभ्रम’ म्हणून पाहिले गेले. परिणामी, आ. विटेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित नगरसेवकांना चांगलेच झापल्याची चर्चा आहे.
आमदारांच्या संतापानंतर संबंधित नगरसेवकांनी तातडीने बॅनरवरून आपले फोटो हटवले. काही ठिकाणी संपूर्ण बॅनरच काढून टाकण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचे हे नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आहेत. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसताना अशा प्रकारे दुस-या पक्षाच्या बॅनरवर फोटो टाकणे आणि त्यानंतर नेत्याच्या धाकाने माघार घेण्याच्या भुमिकेमुळे संबंधीत नगरसेवकांची मोठी राजकीय नामुष्की झाल्याची पाथरी तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे.
वर्चस्वाची लढाई
वरीष्ठ पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी आहेत. परंतू पाथरीत मात्र या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे बॅनर नाट्यामुळे समोर आले आहे. तुम्ही नक्की कोणत्या पक्षात आहात? या आमदारांच्या एका प्रश्नाने नगरसेवकांची उडालेली धांदल आणि त्यांनी घेतलेली माघार सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ही महायुतीमधील कमकुवत समन्वयाचे प्रतीक मानली जात आहे.
कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण
एकीकडे विकासासाठी एकत्र आल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे वाढदिवसाच्या बॅनर नाट्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. नगरसेवकांची ही ‘एक्झिट’ केवळ एका बॅनरपुरती मर्यादित नसून, आगामी काळात पाथरीच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची ही चिन्हे तर नाहीत ना? असा सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

