Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ स्फोटके आढळल्याने खळबळ; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ स्फोटके आढळल्याने खळबळ; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान आज एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता, त्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर स्फोटके सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ४५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंगळुरूमध्ये आले होते. त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून मार्गाची आणि परिसराची कसून तपासणी केली जात होती. यावेळी कनकपुरा रोडवरील कग्गलीपुरा भागात, मुख्य कार्यक्रम स्थळापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर दोन जिलेटिनच्या कांड्या (Gelatin sticks) पोलिसांना आढळून आल्या.
सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

स्फोटके सापडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर सुरक्षित केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची एका गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. थाथागुनी परिसर, कग्गलीपुरा भागात दोन जिवंत जिलेटिनच्या कांड्या फूटपाथच्या बाजूला आढळून आल्या असून कोरामंगला भागातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने स्फोट करण्याची धमकी देणारा फोन केला होता, त्यानंतर तपासणीत ही स्फोटके सापडली.

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेत एवढी मोठी चूक कशी झाली आणि ही स्फोटके तेथे कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवली होती, याचा सखोल तपास आता पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR