लातूर : प्रतिनिधी
आगामी काळात गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हे अभियान लातूर शहर मतदारसंघात राबविण्यात येणार असून लातूर शहर मतदार संघात शिवसेनेची बांधणी भक्कमपणे करून येथे सेनेला चांगले दिवस आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके यांनी लातूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी शिवसेनेची सोमनाथ स्वामी डिगोळकर, लातूर शहरप्रमुख मोहन दिवटे, शिवसेना पदाधिकारी संतोष पाटील, बाळासाहेब दंडिमे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शेळके म्हणाले की, येणा-या काळामध्ये शिवसेनेची पाळामुळे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे यासाठी जीवांचे रान करून शिवसेनेचा भगवा झेंडा आगामी काळात लातूर शहर महापालिका व लातूर शहर विधानसभेत फडकावण्याचा मानस आहे. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी लातूर शहरात प्रभावीपणे कार्य करू यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी माहिती मोहन दिवटे यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

